सांगली : खडाजंगीनंतर संभाजी महाराज पुतळा जागा निश्चित

छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासाठी जागा निश्चितीस होत असलेल्या विलंबावरून मंगळवारी महापालिकेत महापौर दालनातील बैठकीत खडाजंगी चर्चा झाली. बैठकीतील तापलेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून तातडीने जागा निश्चित झाली. प्रतापसिंह उद्यानात उभारण्यात आलेल्या रणगाडा जागेच्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात येणार आहे. महापौर, आयुक्त, पदाधिकारी, नगरसेवक व संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत जागेवर शिक्कामोर्तब झाले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र जागा निश्चितीअभावी पुतळा उभारणी रखडली आहे. विविध संघटनांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला. मावळा प्रतिष्ठानचा आंदोलनाचा इशारा, साथीदार गु्रुपने महापालिकेला दिलेला आठ दिवसांचा अल्टिमेटम या पार्श्वभूमीवर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व संघटना प्रतिनिधींची तातडीने बैठक घेतली.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे, सभागृह नेते तथा भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक अभिजित भोसले, मयूर पाटील, युवराज बावडेकर, संतोष पाटील, तौफिक शिकलगार, हरिदास पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सचिन पवार, मावळा प्रतिष्ठान व रॉयल्स युथ फाऊंडेशनचे संस्थापक ऋषिकेश पाटील, अक्षय सावंत, पियुष पाटील, मराठा सेवा संघाचे योगेश सूर्यवंशी, अजय यादव, चैतन्य पाटील व अन्य संघटनांचे प्रतिनिधी तसेच शहर अभियंता संजय देसाई, मालमत्ता व्यवस्थापक नितीन शिंदे उपस्थित होते.
महापौर दालनातील बैठकीत पुतळ्यासाठी जागांबाबत चर्चा सुरू होती. जागेचे वेगवेगळे पर्याय पुढे येत होते. दरम्यान, केवळ बैठका आणि चर्चा आता पुरे. एका जागेवर एकमत करा, असे महापौर सूर्यवंशी यांनी सुनावले. तोपर्यंत स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते विनायक सिंहासने, भाजपचे नगरसेवक युवराज बावडेकर महापौर दालनात आले. पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करा, अन्यथा एखाद्या जागेवर पुतळा उभारल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल, असे स्पष्ट केले.

बैठकीच्या चर्चेचा आवाज मोठा झाला. खडाजंगी सुरू झाली. वातावरण तापले. या सार्‍याचा परिणाम म्हणून प्रतापसिंह उद्यानातील जागा निश्चित झाली. उपस्थित सर्वांनीच तातडीने प्रत्यक्ष जागेला भेट दिली. रणगाडा उभारलेली जागा निश्चित करण्यात आली. त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांच्या दालनातील बैठकीत जागेवर शिक्कामोर्तब झाले. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीस प्रभाग 16 मधील जागा निश्चित केल्याबद्दल नगरसेवक मयूर पाटील, तौफिक शिकलगार यांनी महापौर, आयुक्तांचे आभार मानले.

शिव-शंभूसृष्टी
महापौर, आयुक्त, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, संघटनांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रतापसिंह उद्यानातील जागेवर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले. या उद्यानात शिवसृष्टी प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचाही पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्तावात थोडा बदल करून शिव-शंभू सृष्टी उभारण्याचा निर्णय झाला. शिव-शंभू सृष्टी उभारणी, छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणीचे काम गतीने करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *