सांगलीत आढळला दुर्मीळ पांढरा कवड्या साप
येथील कलानगर परिसरात रंगद्रव्यविरहित (पांढरा) कवड्या साप आढळला. अशा रंगहीन सापाला ‘ल्युकॅस्टिक वोल्फ स्नेक ’ हे नामाभिधान आहे. हा साप दुर्मीळ मानला जातो.
सांगली जिल्ह्यात असा साप पहिल्यांदाच आढळला. वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कम्युनिटीचे सदस्य डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी ही माहिती दिली. मंगळवारी रात्री उशिरा कलानगर, बायपास रोड येथे संजय पाटील यांच्या घराच्या शेजारी पार्किंगमध्ये साप असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्राणिमित्र डॉ. पाटील यांना बोलावले. हा साप अल्बोनी असल्याचे निदर्शनास आले.
तसेच हा रंगविरहित दुर्मीळ साप आहे, त्याला काळजीपूर्वक पकडून नैसर्गिक आधिवासात सोडण्यात आले. पांढरा रंग, डोळे लाल किंवा काळे असतात. मात्र, सापडलेल्या सापाचे डोळे काळे होते. त्यामुळे तो अतिदुर्मीळ असल्याचे त्यांनी सांगितले. जनुकीय बदलामुळे सापाचा त्वचेचा रंग पांढरा होतो. प्राण्यांमध्ये 30 ते 40 हजारांत असा एखादा प्राणी आढळतो. सापांमध्ये असा प्रकार अत्यंत दुर्मीळ आहे.