सांगली : आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची प्रतीक्षा
तालुक्यातील भिलवडी व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंजूर सेवक वर्गापैकी बहुसंख्य पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा भार आहे. ही रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. भिलवडी आरोग्य केंद्रातून 19 गावांना तर, कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रातून 16 गावांना आरोग्य सेवा पुरविण्यात येते. याठिकाणी खासगी रुग्णालयाप्रमाणे उपचार होतात. यामुळे रुग्णांची गर्दी असते.
भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे 3 आहेत. पण 1 पद रिक्त आहे. औषध निर्माण अधिकारी मंजूर पद एक आहे. तेही भरले नाही. आरोग्य सेवक पुरुष मंजूर पदे 7 कार्यरत 5, आरोग्य सेवक महिला मंजूर पदे 9 कार्यरत 4 आहेत. कार्यरत असलेल्यापैकी 1 लवकरच निवृत्त होणार आहेत. खासदार संजय पाटील यांनी भिलवडी केंद्राला भेट देऊन रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु 15 महिने उलटून गेले तरी या ठिकाणी कोणतीही पदे भरण्यात आली नाहीत.
कुंडल प्राथमिक केंद्रासाठी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मंजूर पदापैकी नर्स -4, आरोग्य सेवक -2, शिपाई -2 अशी 8 पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य सहाय्यिका 2 ची गरज आहे. केंद्राला किमान 3 निवासी आरोग्य सेविकांची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने भिलवडी व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे. कुंडल, भिलवडी केंद्रासाठी तातडीने गरोदर मातांसाठी तपासणीचे फिटल डाप्लर मशिनची आवश्यकता आहे.
शवविच्छेदनासाठी स्वीपर नाही
पलूस तालुक्यात सतत अपघात व इतर घटनामुळे कुंडल, भिलवडी केंद्रात तसेच पलूस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह येतात. मात्र या ठिकाणी स्वीपर नाही. शवविच्छेदनासाठी अनेक वेळा नातेवाईकांनाच स्वीपर शोधण्यासाठी धावाधाव करावी लागते. यासाठी स्वीपरची तातडीने नेमणूक करण्याची गरज आहे.