अवैध धंदे बंद न झाल्यास गृहमंत्र्यांकडे तक्रार; पालकमंत्री सुरेश खाडे यांचा इशारा

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात अवैध धंदे बेलगामपणे सुरू आहेत. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा ही निष्क्रिय बनली आहे. सर्व अवैध धंदे बंद नाही झाले तर याबाबतची तक्रार गृहमंत्र्यांकडे केली जाणार आहे, असा इशारा कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला.

खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये घरफोड्या, दुचाकींची चोरी, मटका, जुगार अड्डे असे अवैध धंदे वाढत चालले आहेत. हे आपल्याला शोभनीय नाही. यावर पोलिसांचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा असक्षम बनली आहे. याबाबत खासदार संजय पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची भूमिका योग्यच आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यांना मी विनंती वजा आदेश देत आहे, की जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत. याबाबत सविस्तर अहवाल तयार करून गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल पाठविला जाईल. पोलिस अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही.

ना. खाडे म्हणाले, येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील कामकाजाबाबत आयुक्तांना जबाबदार धरले जाईल. टेंडरमध्ये ठरल्याप्रमाणे कामे ही झाली पाहिजेत. काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये मिरज मतदारसंघाला निधी दिला जात नव्हता. मात्र, आता मी मंत्री झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यात सुमारे 92 कोटी रुपयांचा निधी मिरज तालुक्यात आणला आहे.

शिवाय सांगली जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मिरजेतील राजीव गांधीनगर येथील अंडर पास व सर्व्हिस रोडचा प्रश्न निकालात काढला आहे. त्यासाठी 10 कोटी 35 लाख रुपये मंजूर झाले आहेत. म्हैसाळ रोड ते बेळगाव रेल्वे लाईनपर्यंत दोन्ही बाजूस रोड, म्हैसाळ रोड ते राजीव गांधीनगर रोड दोन्ही बाजूस रोड, बेळगाव रेल्वे लाईनपासून गोळीबार रोडपर्यंत रोड, पंढरपूर रेल्वे लाईनपासून ते बोलवाड रोडपर्यंत दोन्ही बाजूसरोड, दांडोबा फाटा येथे ब्रीज, यासह शहर व ग्रामीण भागातील विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *