हातभट्टी दारूची ‘होम डिलिव्हरी!’
सांगली, मिरजेसह जिल्ह्यात हातभट्टी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक निर्जन ठिकाणी हातभट्टी निर्मित्तीचे अड्डे वाढले आहेत. पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘नजर’ चुकवून या दारूची ‘होम डिलिव्हरी’ केली जात आहे. यासाठी मोबाईलवर ‘ऑर्डर’ घेतली जात आहे.
देशी दारूच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे विक्रीत काही प्रमाणात घटही झाली आहे. एका बाटलीची 70 रुपये किंमत आहे. गावोगावी दुकाने आहेत. पूर्वी पहाटे दुकाने उघडली जात होती. मात्र गेल्या काही वर्षात वेळेवर बंधन आल्याने ही दुकाने आता नऊ वाजता उघडली जातात. पहाटेपासून दारू पिणारे खूप तळीराम आहेत.
देशी दारूच्या दरातील वाढीमुळे अनेक तळीरामांनी हातभट्टी दारू पिण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे हातभट्टीला मागणी वाढली आहे. विक्रीत खूप वाढ झाली आहे. ही दारू विकण्यास रीतसर परवाना नसल्याने गावोगावी छुपे अड्डे सुरू आहेत. कर्नाळमधील कंजारभाट, कुपवाड, मिरज, जत-कर्नाटक सीमा भागात, आटपाडी आदी ठिकाणी हातभट्टी दारूची निर्मित्ती केली जात आहे. पूर्वी भल्या पहाटे रबरमध्ये दारू घालून सायकलवरून त्याची वाहतूक केली जात होती. मात्र दारू तस्करांनी आता दारू पोहोच करण्यासाठी एजंटांची नियुक्ती केली आहे. हे एजंट पहाटेच्यावेळी दुचाकीवरून कॅनमध्ये दारू घालून ती पोहोच करीत आहेत. पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईचा समेमिरा टाळण्यासाठी प्लॉस्टिकची पिशवीतून दारूची विक्री केली जात आहे. घरामध्ये तसेच पडक्या जागेत कुठेही आडोशाला दारू विक्रीचे अड्डे सुरू होते. पोलिसांनी कारवाईचा धडका लावल्याने विक्रेत्यांनी आता प्लास्टिकचे पाऊच करून ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली आहे.
दहा रुपयाला एका ग्लासची विक्री केली जात आहे. पाऊचमध्ये दोन ग्लॉस भरले जातात. दोन पाऊच घेतले तर दोन क्वॉटरची नशा येत आहे. चाळीस रुपयात दोन पाऊच ‘होम डिलिव्हरी’ मिळत असल्याने देशी दारू पिणार्या तळीरामांनी आता हातभट्टी दारू पिण्यास सुरू केली आहे. मोबाईलवर ऑर्डर घेऊन ती घरपोच केली जात आहे. देशी दारूच्या बाटलीला 70 रुपये मोजण्यापेक्षा 40 रुपयांत दोन पाऊच मिळत असल्याने मागणी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.
तस्करांकडून जीवाशी खेळ : आरोग्यास घातक
cc शरीराला घातक असणार्या या दारूने आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत. तरीही तस्करांकडून जीवाशी खेळ सुरूच आहे. पंधरा वर्षांपूर्वी मुंबईत विषारी दारूने अनेकांचे बळी गेले होते. त्यानंतर राज्यभर हातभट्टी अड्ड्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली होती. मात्र या कारवाईत सातत्य राहिले नाही.
पोलिसांकडून छापे, तरीही विक्री जोमात
हातभट्टी दारूची विक्री करणार्या अड्ड्यांवर पोलिसांकडून सातत्याने छापे टाकले जात आहेत. विक्रेत्यांना अटक केली जाते. त्यांच्याकडून चार-पाचशे रुपयांची दारू जप्त केली जाते. मात्र विक्रेते लगेच जामिनावर बाहेर येऊन पुन्हा विक्रीचा व्यवसाय करीतच आहेत. देशी, विदेशी, ताडी, सिंधीच्या विक्रीत घट होऊ नये, यासाठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अडड्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.