सांगली : जिल्ह्यात डासांचा उच्छाद : डेंग्यूला आमंत्रण
सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात डासांचा उच्छाद झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात 38 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांच्या गर्दीने सध्या रुग्णांलये फुल्ल झाली आहेत. हा जीवघेणा रोग आटोक्यात आणण्यासाठी आता युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तीन महिन्यांत दि. 28 ऑक्टोबरपर्यंत ताप आलेल्या केवळ 333 रुग्णांच्या सॅम्पलची तपासणी करण्यात आली होती. या सर्व्हेमध्ये एकूण 57 रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत. परिणामी रुग्णांलये रुग्णांच्या गर्दीने फुल्ल झाली आहेत. त्यामुळे तपासणीचे प्रमाण वाढवल्यास रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बांधकामाची ठिकाणी बनली आहेत डेंझर झोन
जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या डबक्यांमध्ये डासांची पैदास होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात सुरू असणार्या बांधकामाच्या ठिकाणी भरण्यात येणार्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे डास आढळून येत आहेत. प्रशासनाकडून स्वच्छता करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी अरेरावी केली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून पसरणारा विषाणूजन्य रोग आहे. एडीस इजिप्ती या जातीचा डास चावला की डेंग्यू होतो. तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, अशी डेंग्यूची लक्षणे आहेत. डेंग्यूवर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा घातक आजार रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच प्रशासनाकडून सांगण्यात येणार्या सूचनांचे पालनही होणे गरजचे आहे.
तपासणीचे प्रमाण वाढवण्याची मागणी
तपासण्या कमी होत असल्याने रेकॉर्डवर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. मात्र, तपासण्या वाढवल्यास आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रुग्ण संख्या कमी असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र, तपासण्या कमी होत असल्याने शासन दरबारी साथीच्या आजाराचे रुग्ण कमी दिसत आहेत. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाही तर यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात तीन महिन्यांतील डेंग्यू रुग्णांचा लेखाजोखा
ऑगस्ट महिन्यात डेंग्यू दूषित रुग्ण बोलवाड-1, कानडवाडी-1, नरवाड-1, आरग-1, धामणी-1, खटाव-1, बोरगाव (देशिंग)-3, पेड-1, गव्हाण-1, चिंचणी-1, आरवडे-4, भिलवडी-1, नागठाणे-1, दुधोंडी-2
सप्टेंबर महिन्यात डेंग्यू दूषित रुग्ण जत-1, निंबवडे-1, भिलवडी-1, चिंचोली-2
या उपाययोजना हव्यात
तुंबलेल्या गटारी वाहत्या करा.
पाणी साठलेली डबकी मुजवा.
उघड्या डबक्यांमध्ये वाहनांचे जळके ऑईल टाका.
पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेऊन कोरडा दिवस पाळा.
धूरफवारणीचे नियोजन करा.