सुधा मूर्ती-संभाजी भिडे भेटीने उलटसुलट चर्चा

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवारी सांगलीत आल्या होत्या. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांच्याशी झालेल्या भेटीवरून (meeting) उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. समाजमाध्यमांवरून या भेटीबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात येऊ लागले आहेत.

सुधा मूर्ती या सांगलीत आल्यानंतर संभाजी भिडे यांनी त्यांची भेट घेतल्याचा आणि सुधा मूर्ती यांनी त्यांना आदरयुक्त नमस्कार केल्याचा फोटो व्हायरल झाला. त्यामुळे या घटनेवरून चर्चेला सुरुवात झाली आहे. परंतु सांगलीत ज्यांनी सुधा मूर्ती यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्या योजना यादव मात्र या भेटीबाबत भिडे यांनी हद्द केल्याचे फेसबुकद्वारे स्पष्ट केले आहे.

याबाबतच्या पोस्टमध्ये यादव यांनी म्हटले आहे की, कार्यक्रमाच्या अगोदर भेटीबाबत (meeting) भिडे यांचे दोन -तीन फोन आले होते. सुधाताईंना भेटायचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु आम्ही मात्र सुधाताई कोणाला भेटणार नसल्याचे त्यांना सांगितले. परंतु भिडे यांनी आपला हट्ट सोडला नाही.

सुधाताई सांगलीत आल्यानंतर भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल शोधले. कार्यक्रम 5 वाजता होता. सुधाताईंना विश्रांती हवी होती, परंतु भिडे हे हॉटेलवर दुपारी 3 वाजताच येऊन बसले. काहीतरी गडबड होईल म्हणून आम्ही सुधाताईंना हॉटेलच्या मागच्या दरवाजाने बाहेर काढून कार्यक्रमस्थळी आणले. त्यावेळी भिडेंचे कार्यकर्ते गाडीच्या दिशेने धावत आले. आम्ही गाडी वेगात कार्यक्रमाच्या ठिकाणी आणली. या प्रकारामुळे सुधाताई त्रासल्या होत्या. त्यांनी विचारले की ही कोण आहे व्यक्ती? आम्ही त्यांना भिडे यांच्याबद्दल सांगितले. त्यानंतर भिडेंचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी हॉलच्या बाहेर जमा होऊ लागले. कार्यक्रम सुरू झाला. बाहेर काही तरी गडबड होईल म्हणून पोलिस आमच्याजवळ येऊन भिडेंना दोन मिनिटे भेटून घ्या, अशी विनंती करू लागले. बाहेरचा प्रकार लक्षात आल्यानंतर सुधाताई कार्यक्रम मध्येच सोडून बाहेर आल्या आणि भिडेंची भेट घेतली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे सांगलीचे प्रमुख हणमंत पवार यांनी दै. पुढारीशी बोलताना योजना यादव यांचे म्हणणे फेटाळून लावले. ते म्हणाले, सुधा मूर्ती आणि भिडे गुरुजींची यांची जुनी ओळख आहे. गुरुजींनी सुधा मूर्तींना भेटण्यासाठी फोन केला होता. पण काही कारणामुळे भेट होऊ शकली नाही. पण सुधा मूर्ती सांगलीत आल्यानंतर त्यांच्याशी बोलूनच त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये गुरुजींनी रायगडावरील नियोजित सुवर्ण सिंहासनाबाबत चर्चा केली. तसेच सूधा मूर्ती यांचे जावई हे इंग्लंडचे पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार व वाघनखे हे इंग्लंडमध्ये आहेत, ते भारतात आणण्याविषयीबाबत चर्चा झाली. यासंदर्भात सुधा मूर्ती यांनी फेब्रुवारीमध्ये पुन्हा सांगलीला येणार असल्यामुळे त्यावेळी चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *