सांगली : काम अपुरे, तरीही वाहनधारकांना टोलचा भुर्दंड
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे सांगली जिल्ह्यातील काम अद्याप अपूर्ण आहे. विविध ठिकाणी पुलाचे काम, सेवा रस्ते, वीज ही कामे झालेली नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी हा महामार्ग अद्याप धोकादायक आहे. तरीसुद्धा या महामार्गावर (highway) टोल सुरू केला आहे. काम अपूर्ण असताना नागरिकांना टोलचा भुुर्दंड बसत आहे.
रत्नागिरी-नागपूर हा 166 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग (highway) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि मिरज या दोन तालुक्यांतून जाणार आहे. काही उड्डाणपुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तानंग फाटा ते धामणी इथेपर्यंत रस्ता अजून सुरू व्हायचा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मिरज शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. एरव्ही मिरज ते सोलापूर अंतर पार करायला सरासरी चार तास लागत होते. आता अडीच ते पावणेतीन तासांत हे अंतर पार होते. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी धार्मिक पर्यटन केंद्रांशी जोडण्यासाठी हा महार्माग अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. तसेच द्राक्षनगरीला बेदाणा झोनशी जोडणारा हा मार्ग आहे. या महामार्गाचा परिसरातील लोकांना फायदा होणार आहे. यापूर्वी अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. अपघात मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे हा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. त्याप्रमाणे सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत.
कळंबी, मिरज परिसरातील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. बहुतेक ठिकाणचे सेवा रस्ते खराब आहेत. पुलाखाली पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. घोरपडी येथे सतत अपघात होतात. त्या ठिकाणी उड्डाणपूल करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
एका बाजूला काम अपूर्ण असताना टोल मात्र सुरू झाला आहे. सोलापूर ते सांगलीपर्यंत सध्या बोरगाव, नाजरेमठ, मंगळवेढा या तीन ठिकाणी टोल नाके आहेत. बोरगाव येथे कार, जीप, प्रवासी व्हॅन, हलक्या मोटारी यासाठी एकेरी फेरीसाठी 65 रुपये टोल आहे. परतीच्या प्रवासासह 100 रुपये, मासिक पास (50 फेर्या) वैधता 2,240 रुपये, जिल्हाअंतर्गत मुद्रांकित वाणिज्य वाहनासाठी 35 रुपये, हलके वाणिज्य वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस प्रत्येक फेरीसाठी 110 रुपये, परतीच्या प्रवासासह 165 रुपये, मासिक पास शुल्क 3,615 रुपये आहे. तानंग फाटा ते धामणी येथील रस्त्याचे अद्याप काम अपुरे आहे. त्यामुळे टोलबाबत लोकांत नाराजी आहे.