मिरजेतील रस्त्यांसाठी ७५ कोटी मंजूर : सुरेश खाडे
मिरज शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांची मंजुरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, अशी माहिती कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बुधवारी दिली.
खाडे म्हणाले, मिरज शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे मिरजेतील नागरिकांची व मिरज शहरात येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनाही भेटून रस्ते विकास करण्यासाठी ७५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. दोघांनीही या कामासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हा निधी आल्यानंतर मिरजेतील अनेक रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागेल. हा निधी मिळाल्यानंतर तो महापालिकेच्या बांधकाम विभागाऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दर्जेदार पद्धतीने करून घेण्यात येणार आहे. नागरिकांनी व नगरसेवकांनीही यामध्ये लक्ष घालून दर्जेदार रस्ते करून घेण्यासाठी मदत करावी. मिरज शहरातील तालुका क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी मिळाली आहे. मिरजेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे नवीन एमआरआय मशीन खरेदीसाठी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.