अजितदादा कधी रडतात, कधी पळून जातात : बावनकुळेंनी डिवचलं

माझ्या बारामतीच्या एका दौऱ्यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहे. करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवार देखील भेटणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. अजित पवारांच्या वागण्याबद्दल तिथे प्रचंड नाराजी आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम २०२४ मध्ये जनता करणार आहे. त्यांचे कुठलेही चॅलेंज आम्ही स्वीकारायला तयार असल्याचे बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादी सत्तेत आली, तेव्हा सत्तेची फळे अजितदादांनी चाखली आहेत. तरीही पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला नाही. सत्तेपासून पैसा आणि पैसापासून सत्ता, असे त्यांचे राजकारण राहिले आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे बघायला हवे. ते ओबीसींचे मारेकरी आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.लोकायुक्त कायदा हा महत्त्वाचा आहे. ज्यांनी ५० वर्षे सत्तेपासून पैसा कमविला. त्यांना लोकायुक्ताची भीती वाटते आहे. घोटाळ्याचे बॉम्ब आमच्याजवळही आहे. पीएमआरडीएमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किती जमिनी ग्रीनबेल्टच्या यलोबेल्टमध्ये केल्या एवढे जरी मांडले तरी भरपूर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

जशी माझी एन्ट्री झाली तेव्हापासून माझी अजितदादांना भीती वाटतेय. आमचा करेक्ट कार्यक्रम करू, असं त्यांनी काल सभागृहात म्हटलं आहे. पण आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची अजितदादांमध्ये हिंमत नाहीए. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४ मध्ये जनता ठरवणार आहे. त्यामुळे खरंतर अजित पवारांच्या तोंडून हे शब्द शोभत नाहीए. अजितदादा आम्हाला माहितीए. वेळप्रसंगी आठ आठ दिवस मोबाइल बंद करून पळून जातात. कधी रडतात, कधी पळून जातात, आठ आठ दिवस मोबाइल स्वीच ऑफ ठेवतात आणि अंडरग्राउंट होतात, असे अजितदादा बघितले आहेत आम्ही. अजितदादांनी चॅलेंज करू नये विदर्भामध्येस असे बावनकुळे म्हणाले.
टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होणार

दरम्यान, टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्या कंपन्या पात्र नाही, त्यांनाच पात्र ठरविण्यात आले. त्यांना पात्र केले नसते, तर हा घोटाळाच झाला नसता. हे मंत्रालय स्तरावर झाले आहे. टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. तर गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. गाव नमुन्यात काहीही बदल झाला नाही. माझ्या आदेशामुळे शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असेल. आरोपात काही तथ्य नसल्याचे स्पष्टिकरण कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिले. मागासवर्गीयाला न्याय दिला. विरोधकांनीच मोठ्या प्रमाणात जमिनी हडप केला असल्याचा आरोपही अब्दुल सत्तार यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *