सांगलीत भटक्या कुत्र्यांची दहशत, रोज 6 जणांवर होतोय जीवघेणा हल्ला!

सांगली महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यात मनपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शामरावनगर येथील आदित्य कॉलनीमधील सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नऊ वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. यामध्ये आरूष दळवी हा जखमी झाला आहे. गेल्या वीस दिवसात 128 बालकांना भटक्या कुत्र्यांनी लक्ष्य केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. ही नियंत्रणात आणण्यात मनपा प्रशासनाला यश आले नाही. महासभा असो अथवा स्थायी समिती भटक्या कुत्र्यांवरून सभा गाजते. मात्र प्रशासन याचे गांभीर्य घेत नाही. शहरातील अनेक चौका-चौकात भटकी कुत्री टोळीने फिरत असतात. कुत्र्यांनी शहरात दहशतच निर्माण केली आहे. नागरिकांवर,लहान मुलांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांमध्ये असंतोष

शामरावनगरमधील आदित्य कॉलनी येथे घरासमोर खेळत असलेल्या आरुष संदीप दळवी (वय 9) या बालकांवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्याच्या मांडीने लचके तोडले. या घटनेमुळे संपूर्ण शामरावनगरमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कुत्र्यांचे मुलांवरील हल्ले पाहता नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.मनपा क्षेत्रात गेल्या 20 दिवसांमध्ये तब्बल 128 बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. एखाद्या मुलाचा बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार काय? असा सवाल नागरिक करत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी या संदर्भात बैठक घेतली होती.

आंदोलनाचा इशारा

कर्मचार्‍यांना कुत्री पकडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र सभापतींच्या आदेशाचे पालन झाल्याचे दिसून येत नाही. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मनपाची आवश्यक यंत्रणा देखील नाही. त्यामुळे दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू लागली आहे. महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *