सांगली : अखेर शिवप्रेमींनी जिंकली ‘लढाई’, प्रशासन झुकले
सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर मानले जाणाऱ्या आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली. दरम्यान, प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हठवण्यात आल्याने या ठिकाणी रस्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं होते. याप्रकरणी सांगली पोलिसांनी 30 जणांना ताब्यात घेतलं होत. दरम्यान हे वातावरण आणखी चिघण्याची शक्यता होती. परंतु यावर तोडगा काढण्यात आल्याने आंदोलकांच्या प्रयत्नाला यश आल्याचे बोलले जात आहे.
सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे शिवप्रेमींच्या आंदोलनाला यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेच्या हस्तांतरणाला परवानगी देण्यात आल्याने यावर तोडगा निघाला आहे. प्रशासनाने हा निर्णय घेतल्याबद्दल आष्ट्यामध्ये जल्लोष करण्यात आला. दरम्यान याबाबत तीन दिवस आष्टा शहर बंदची हाक देण्यात आली होती.
हा बंद आता मागे घेण्यात आला आहे. या शहरात मोठा बगीचा आणि त्या बगीच्यामध्ये शिवरायांचा पुतळा बसवण्याची परवानगीचे पत्र देण्यात आले आहे. या बगीच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. यामुळे आष्टा शिवप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आले आहे, तर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी समस्त शिवप्रेमी आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महाआरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पुतळ्याच्या परिसरामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाआरती करणार या भूमिकेवर शिवप्रेमी ठाम आहेत, त्यामुळे पुतळ्याच्या मागील बाजूस शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं.
कोणत्याही परिस्थितीमध्ये सायंकाळी 7:00 वाजता महाआरती करणारचं, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली होती. तसेच प्रसंगी उद्या वाळवा तालुका बंद करू असा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आता प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करून पुतळ्याच्या परिसरामध्ये जाण्यापासून मज्जाव केला आहे.