आष्ट्यासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण

सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर मानले जाणाऱ्या आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ( statue) गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली. दरम्यान, प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हठवण्यात येणार असल्याचे समजल्याने या ठिकाणी रस्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं. भाजपचे निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान हे सुरू असताना आज (दि.04) जानेवारी रात्री पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. हा पुतळा हटवल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवभक्तांकडून रातोरात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाकडून हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील संपूर्ण परिसरातील वीज प्रवाह खंडित करून शिवरायांचा पुतळा काढण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

विज प्रवाह खंडीत केल्याने संपुर्ण शहरात अंधार झाला आहे. पुतळा ( statue) हटवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयानंतर रास्ता रोको प्रकरणी तीस आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या विरोधात समस्त शिवप्रेमींची आज (दि.04) बुधवारी वाळवा तालुका आष्टासह वाळवा तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

सांगलीच्या आष्टा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे, त्यानंतर पुतळा परिसरात प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आले आहे, तर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी समस्त शिवप्रेमी आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महाआरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पुतळ्याच्या परिसरामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाआरती करणार या भूमिकेवर शिवप्रेमी ठाम आहेत, त्यामुळे पुतळ्याच्या मागील बाजूस शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं.

कोणत्याही परिस्थितीमध्ये सायंकाळी 7:00 वाजता महाआरती करणारचं, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली होती. तसेच प्रसंगी उद्या वाळवा तालुका बंद करू असा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आता प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करून पुतळ्याच्या परिसरामध्ये जाण्यापासून मज्जाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *