कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, सांगलीकरांचं आरोग्य धोक्यात
सांगलीतील वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेटावरील कृष्णापात्रात मृत माशांचा खच लागला आहे. परिसरातील साखर कारखान्यातील मळीच्या पाण्यामुळे कृष्णा नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळेच माशांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितलं जात आहे. मृत माशांमुळे दुर्गंधी पसरली असून पाणी दूषित झाले आहे.
दूषित पाण्यामुळे माशांना हवा तेवढा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे या ठिकाणी मासे मरत असल्याचे स्थानिक नागरिकांतून सांगण्यात आले आहे. तर मेलेल्या माशापासून व दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या गावामध्ये दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.बहे गावातील पंतार्याजवळ केमिकल युक्त पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवित धोका निर्माण झालेला आहे. तसेच यापूर्वी मागील वर्षाच्या जुलै, ऑगस्टमध्ये केमिकल पाणी कृष्णा नदीत सोडल्यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले होते व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता तसेच सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळ सांगली यांच्याकडे तक्रार केली असता कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल फराटे यांनी सांगितले.