सांगली : अल्पवयीन मुलीवरअत्याचार करणारा पोलिस निलंबित
सांगली येथील प्रेमनगरमध्ये ‘रेड लाईट’मधील परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार स्वप्निल कोळी (वय 39, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला गुरुवारी निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी कारवाईचा हा दणका दिला.
कोळी याच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईचा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना सादर करण्यात आला आहे, असे डॉ. तेली यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. कोळीला कोणी अन्य अधिकार्यांनी पाठीशी घातले असेल, तर त्यांची चौकशी केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. तेली यांनी सांगितले.
पीडित मुलगी 17 वर्षांची आहे. ती दसरा चौकातील ‘रेड लाईट’ एरियात राहते. 2022 मध्ये संशयित कोळी मुलगी राहत असलेल्या खोलीत गेला. त्याने तिला धमकावून दोन वेळा अत्याचार केला. तू ‘रेड लाईट’मध्ये राहतेस. तुला इथं राहता येणार नाही. तुला इथं राहायचं असेल, तर मला पैसे द्यावे लागतील’, असे म्हणून तिच्याकडे खंडणीची मागणी केली. मुलीने हा प्रकार एका सामाजिक संस्थेला सांगितला होता. संस्थेच्या पदाधिकार्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे तक्रार केली होती.
चौकशीत कोळी याने वरिष्ठांच्या सांगण्यावरून पीडित मुलीच्या घर मालकिणीकडून सात लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मुलीची फिर्याद घेऊन कोळीविरूद्ध बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक तातडीने अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.