सांगलीत तीन दुकानांना भीषण आग

टिंबर एरियात तीन दुकानांना गुरुवारी सकाळी भीषण आग (fire) लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

लाकडी फर्निचरचे यात दुकान असल्याने आग झपाट्याने पसरली. सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली. गणपती फर्निचर, लक्ष्मी ट्रेडर्स व हार्डवेअर तसेच कृष्णा टिंबर डेपो या तीनही दुकानांत आग लागली. तयार लाकडी फर्निचर व लाकडांची वखार

असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अगदी काही वेळातच तीनही दुकानांना आगीने वेढले. परिसरातील नागरिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलास दिली. यानंतर सहा वाहनांसह अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सलग पाच तास प्रयत्न केल्यानंतर आग (fire) आटोक्यात आली.

मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, उपअग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यासह वीस जवान याठिकाणी उपस्थित होते. आग मोठी व तीव्रता जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. पोलिसांचेही पथक घटनास्थळी दाखल झाले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही तसेच नेमके किती रुपयांचे नुकसान झाले याबाबतही माहिती मिळाली नाही. स्थानिक लोकांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *