नशेच्या गोळ्या, गांजा विक्रीच्या विळख्यात कुपवाड!
येथील एमआयडीसी पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात गुटखा, मावा आणि विशेषत: नशेच्या गोळ्यांची (drug pills) मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. तरुण पिढी तसेच एमआयडीसीतील परप्रांतीय कामगार या नशेच्या गोळ्यांच्या आहारी गेला होता. गोळ्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. विक्री करणार कोण? याची माहिती असून, त्याच्यावर पोलिस कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत.
गुटखा, माव्याची विक्री
दोन वर्षांपूर्वी देशात कोरोना महामारीमुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय हे आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे बेकारी वाढली आणि तेथूनच तरुणांचे पाय आपोआप चुकीच्या कामांकडे वळत गेले.‘संगत गुण का सोबत गुण ’ या म्हणीप्रमाणे तरुण साथीदाराच्या मदतीने व ‘घे की रे काय होतंय’, असा अट्टाहास केल्याने तरुण विविध नशेच्या आहारी जाऊ लागला. कालातरांने त्याची पावले गुन्हेगारीकडे वळली. गुटखा विक्रीवर बंदी असूनही शहरात त्याची खुलेआम विक्री सुरू आहे. माव्याची जोरदार विक्री सुरू आहेे. गांजा विक्रीचे अनेक ठिकाणी अड्डेच झाले आहेत. नशेच्या गोळ्या, औषधे तसेच व्हायटनरचे सेवन करीत आहेत.
नशेच्या गोळ्यांची सवय
शहरात एकजण नशेच्या गोळ्यांची (drug pills) विक्री करीत असल्याची चर्चा सुरू आहे. तो नवीन ग्राहक आले की, त्याला तीन दिवस मोफत गोळी देतो. मग आपूसकच तरुणांना चौथ्या दिवशी या गोळीचे सेवन केल्याशिवाय चैन पडत नाही. चौथ्या दिवसांपासून मात्र तो गोळीचे पैसे घेतो. गोळी विक्रीतून त्याची लाखो रुपयांची उलाढाल आहे. या उलाढालीच्या नफ्यातून त्याने प्रत्येक घटकांशी अर्थसंबंध जोडले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस कोणतीच शासकीय यंत्रणा करत नाही.