सांगली : महापालिकेत भरतीची बोगस जाहिरात व्हायरल
महानगरपालिकेत नोकरभरती सुरू असल्याची बोगस जाहिरात व्हॉटस्अॅप, सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे. व्हॉटसअॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिध्द झालेल्या बोगस जाहिरातीवर कोणीही विश्वास ठेवू नये. नोकरीच्या आमिषाने फसवणुकीला ( fraud) बळी पडू नका, असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.
उपायुक्त रोकडे यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत कोणतीही (मानधन / कायम ) भरती प्रक्रियेबाबतची जाहिरात प्रसिध्द केली नाही. तरिही व्हॉटसअॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेत भरती निघाल्याबाबतची बोगस जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीवर कोणीही विश्वास ठेवू नये. भविष्यात ज्यावेळी महानगरपालिकेमार्फत नोकरभरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल, त्यावेळी वर्तमानपत्र, अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करुनच भरती केली जाईल. त्यामुळे भरतीती बोगस जाहिरात तसेच महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याच्या उद्देशाने कोणाच्याही आमिषाला बळी पडून फसवणूक ( fraud) करुन घेवू नये, असे आवाहन उपायुक्त रोकडे यांनी केले आहे.
जानेवारीतील तक्रारीचे पुढे काय?
महापालिकेचे नाव, शिक्का, जावक क्रमांक, दिनांक व संबंधित अधिकारी यांच्या पदनामाचा शिक्का, बोगस स्वाक्षरी केलेली नोकरभरतीची जाहिरात याआधी जानेवारीदरम्यान व्हायरल झाली होती. त्याप्रकरणी महानगरपालिकेतर्फे दि. 25 जानेवारी 2023 रोजी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीवर पोलिस तपास काय झाला, संबंधित बोगस जाहिरात सोशल मिडियावर कोणी अपलोड केली, बोगस जाहिरात कोण व्हायरल करते, त्याच्या तपासाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.