कृष्णा नदी प्रदूषणप्रश्नी हरित लवादाकडे याचिका
कृष्णा नदीमध्ये (river) दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित लवादाकडे (एन.जी.टी.) पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व अॅड. असीम सरोदे यांनी सोमवार, दि. 13 रोजी दाखल केलेल्या या याचिकेत साखर कारखाना, सांगली महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी केले आहे.
कृष्णा नदीत (river) सतत औद्योगिक वसाहत, साखर कारखाने मळीमिश्रित व महापालिका क्षेत्रातील सांडपाणी विनाप्रक्रिया सोडले जाते. नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे जलचर संकटात आले आहेत. यामुळे हजारो मासे मृत होत आहेत. या सर्वावर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करीत नाही. दरवेळी केवळ कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते, असा आरोप राजू शेट्टी यांनी याचिकेतून केला आहे. त्यामुळे आता थेट पर्यावरण न्यायालयात याचिका दाखल झाल्याने संबंधित अधिकार्यांची जबाबदारी तसेच कारखान्याची व महापालिकेची चिंता वाढली आहे.
शेट्टी यांच्यासह प्रकाश बालवडकर, अनिल मादनाईक, विश्वास बालीघाटे, शैलेश प्रकाश चौगुले, बाळगोंडा म्हादगोंडा पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी सुद्धा याचिकाकर्ते आहेत. या याचिकेत अॅड. असीम सरोदे यांच्यासह अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी, अॅड. सुघांशी रोपिया हे काम बघणार आहेत. याचिकेची सुनावणी येत्या आठवड्यात तातडीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाचे न्या. डी. के. सिंग व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या समक्ष होईल. याद्वारे पर्यावरणाची हानी, माशांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाच्या बेजबाबदारपणाचा हिशेब होईल, असे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.