जिल्ह्यात १६ ‘मर्डर’ची फाईल ‘ओपन’
(crime news) कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील 16 खुनांच्या तपासाची क्लोज करण्यात आलेली फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाला सुरूवात केली आहे. गेल्या सहा वर्षात 23 खुनात काहीच धागेदोरे न लागल्याने तपास गुंडाळण्यात आला होता. सहा खुनांच्या घटनांत मृतदेहांची ओळखच पटलेली नाही.
सांगली, मिरजेसह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तर खुनांच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. खुनाच्या वाढत्या गुन्ह्यांचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. पंचशीलनगर येथील प्रशांत पावसकर या तरुणाचा दगड बांधून कृष्णा नदीत फेकून खून करण्यात आला. दोन महिने तपास झाला. पण धागेदोरे न लागल्याने तपासाची फाईल बंद करण्यात आली. तासगाव तालुक्यातील पाचव्या मैलावर एका गर्भवतीचा खून करण्यात आला. तिची ओळखही पटविण्यात यश आले नाही. त्यामुळे हा खूनही पोलिस दप्तरी अनडिटेक्ट राहिला. कुपवाडला बाळासाहेब दरगावकर यांचा खून करून विहिरीत मृतदेह फेकून देण्यात आला. याचाही छडा लागला नाही.
सांगलीतील कृष्णा नदीच्या काठावर एकाचा दगडाने ठेचून खून झाला. त्याचीही ओळख पटविण्यात यश न आल्याने तपास पुढे सरकलाच नाही. रिक्षाचालकाने एका प्रवाशाचा रिक्षातच भोसकून खून केला. त्याचीही ओळख पटली नाही. असे जवळपास 16 खून अनडिटेक्ट राहिले. त्याची तपासाची फाईल क्लोज करण्यात आली. आता तर तीन महिन्यांपासून खुनांची मालिकाच सुरू आहे. अनैतिक संबंध, पूर्ववैमनस्य, आर्थिक वाद, शेतीचा वाद व कौटूंबिक वादातून खुनाच्या घटना घडल्या. जाडरबोबलाद (ता. जत) येथे गतवर्षी झालेल्या खुनाचा छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश आले नाही. बेडग (ता. मिरज) येथे वृद्धेचा शेतात भरदिवसा खून झाला. याचाही अजून उलगडा झालेला नाही.
कवठेपिरान (ता. मिरज) येथे दोन वर्षापूर्वी तरुण शेतकर्याचा निर्घृण खून झाला. हजारभर लोकांची चौकशी झाली. मात्र हाती काही न लागल्याने सांगली ग्रामीण पोलिसांनी तपास गुंडाळून टाकला. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दोन दिवसापूर्वी फाईल बंद करण्यात आलेल्या खुनांचा तपास पुन्हा नव्याने सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार गुन्हे अन्वेषन विभागाने तपासाला सुरूवात केली आहे. त्यांना कितपत यश येते, याकडे सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (crime news)
दोन मृतदेह सापडलेच नाहीत
सांगलीत एक सराफ व्यावसायिक व सुवर्ण कारागिराचा अपहरण करून खून करण्यात आला. दोन्ही घटना वेगवेगळ्या होत्या. मात्र खुनाची पद्धत एकच होती. खून केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचे मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात फेकून दिले. खुनाचा उलगडा झाला. हल्लेखोरांना अटक झाली, पण दोन्ही मृतदेह सापडले नाहीत. त्यामुळे हल्लेखोरांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली.
तीन मृतदेह जाळलेच!
इनाम धामणी (ता. मिरज) येथे साध्वी मयुरी जैन हिचा गळा आवळून खून करण्यात आला. तिचा मृतदेह गावातील स्मशान भूमीत जाळला. एकाची राख, हाडे फेकून दिली. मिंच्या गवळी याचा समडोळी रस्त्यावर खून करुन मृतदेह जाळला. गेल्याच महिन्यात बावची (ता. वाळवा) येथील ओंकार रकटे याचाही अशाच पद्धतीने खून केला. या तिनही घटनांत मारेकरी सापडले. पण मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने फारसे पुरावे मिळाले नाहीत.