कृष्णा नदी प्रदूषण करणार्या डिस्टलरीचा मालक कोण? : जयंत पाटील
स्वप्नपूर्ती डिस्टलरीची वाहिनी फुटल्याने दूषित (Contaminated) पाण्यामुळे कृष्णा नदीतीतल लाखो मासे मेले. ही डिस्टलरी अधिकृत आहे का? नसल्यास त्याचा मालक कोण आहे? किती काळापासून ही डिस्टलरी सुरू आहे? या डिस्टीलरीच्या माध्यमातून कोणाला फायदा व्हायचा? अशा प्रश्नांचा भडीमार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळाचे गटनेते जयंत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केला.
जयंत पाटील यांच्या या भाषणाची व्हिडिओ काही क्षणातच समाजमाध्यमावर व्हायरल झाली. स्वप्नपूर्ती ही संस्था वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची आहे. जयंत पाटील यांनी याबाबत थेट विधान केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्यावर तर्कवितर्क सुरु आहेत.
येथे कृष्णा नदीत मळी मिश्रीत पाणी मिसळल्याने लाखो मासे मृत पावले. यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचने दरम्यान जयंत पाटील यांनी कृष्णा नदीच्या दूषित (Contaminated) पाण्याचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले, स्वप्नपूर्ती डिस्टलरीचा पाईप फुटल्याने पाणी दूषित झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. वसंतदादा शेतकरी साखर कारखाना हा दत्त इंडिया या कंपनीला चालवण्यासाठी दिलेला आहे. मात्र डिस्टिलरी त्यांच्याकडे दिलेली नाही. तसा आपणच उत्तरात उल्लेख केलेला आहे, स्वप्नपुर्ती शुगर संस्थेचे नाव त्यात आलेले आहे. मी जिल्हा बँकेकडून माहिती घेतली. त्यांनी या कंपनीशी कधीही करार केलेला नाही. वसंतदादा कारखान्याच्या डिस्टिलरीचा ताबा जिल्हा बँकेकडे आहे. स्वप्नपुर्ती कंपनीशी जिल्हा बँकेचा कोणताही करार झालेला नाही, कोणताही मक्ता नाही, या कंपनीचे उत्पादन कुणाकडे जात होते, दारू विक्रीतून आलेला पैसा कुणाकडे जात होता, याची चौकशी कराल का? अनाधिकृतपणे डिस्टीलरी चालवली जात असेल तर तत्काळ कारवाई कराल का? झिरो लिक्विड डिस्चार्जचे या संज्ञेत ही डिस्टिलरी बसवून त्याची सक्ती कराल का? झिरो लिक्विड डिस्चार्ज संकल्पनेत आता इन्सरिशन बॉयलर बसवावा लागतो. त्यात त्याठिकाणी एक थेंब पाणी बाहेर पडणार नाही, अशी व्यवस्था करावी लागते.
सध्या तिथे शेतकर्यांना पाणी मिक्स करून देण्याची प्रथा चालू आहे. त्याला अलिकडे सगळीकडे बंदी घालण्यात आली आहे. स्प्रेमार्टवर स्पेंट वॉश पसरून खत म्हणून वापरण्याची परवानगी देण्याचा नियम आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, झिरो लिक्विडची बंधने त्यांच्यावर घातली पाहिजेत. स्वप्नपुर्ती डिस्टिलरी संस्था ही जिल्हा बँकेला कराराने कधीही दिलेली नव्हती. ही डिस्टिलरी बेकायदा चालवण्याचे काम सुरु होते.
दोन्ही कारखाने बंद : मुख्यमंत्री
या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले, की कृष्णा नदीत मासे मेल्याची तक्रार मिळाल्यानंतर अधिकार्यांनी पाहणी केली. दत्त इंडिया व स्वप्नपुर्ती कंपनीच्या पाहणीचा निष्कर्ष आल्यानंतर दोन्ही कारखाने बंद केले आहेत. या प्रकरणात कुणी आजारी पडलेले नाही, असा आरोग्य विभागाचा अहवाल आहे. या प्रकरणात कारखान्याला नोटीस दिली आहे.
चर्चा निवडणुकांची
जयंत पाटील यांच्या या विधानानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यातील वसंतदादा गट आणि राजारामबापूगटाचा राजकीय वाद अनेक वर्षापासूनचा आहे. यात जयंत पाटील यांनी काही वेळा या घराण्यास मदत केली तर काही निवडणुकात विरोध केला. आता विविध प्रकारच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे.