केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उडाण’च्या यादीत कवलापूर विमानतळाचा उल्लेख

कवलापूर येथे विमानतळ (Airport) कार्यरत होते, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडाण योजनेच्या यादीत ‘बंद अवस्थेत’, असा कवलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. राज्य शासनाने विमानतळाचा विषय निकाली काढला होता. मात्र, एखाद्या कंपनीने प्रस्ताव दिला तर या विमानतळाच्या पुनरुज्जीवनाचा विचार होऊ शकतो, अशी माहिती नवी दिल्लीतील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया प्रशासनाने दिली आहे.

आयआयटीमध्ये कार्यरत स्वानंद बोडस यांनी माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता. कवलापूर येथे विमानतळ व्हावे, या स्वप्नाला आता सकारात्मक दिशा मिळू लागली आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रकरणी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत बैठक बोलावली आहे. त्याआधी विमानतळ प्राधिकरणाने माहिती अधिकार कायद्यातील अर्जास उत्तर देताना महत्त्वाची माहिती उघड केली आहे. त्यामुळे विमानतळाबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑक्टोबर 2016 मध्ये उडान योजना सुरू केली. ही एक व्यापारी धोरणावर चालणारी यंत्रणा आहे. प्रादेशिक हवाई संपर्क मार्गांचा विकास त्यातून होणार आहे. त्या यादीत कवलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. सांगली हे पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मोठे शहर असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. धावपट्टी नादुरुस्त असल्यामुळे बंद असलेले विमानतळ म्हणून कवलापूरचा उल्लेख आहे. उडान योजना अंतर्गत विमानतळ (Airport) विकासासाठी चार फेर्‍या झाल्या. कवलापूर विमानतळ चालवण्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे विमानतळ पुनरुज्जीवन होऊ शकले नाही, असेही त्यात म्हटले आहे. भविष्यात असा प्रस्ताव आल्यास पुनरुज्जीवन शक्य आहे, असे आशादायक उत्तर देण्यात आले आहे.

तांत्रिक आधार मिळाला

कवलापूर येथे नवीन विमानतळाची मागणी नसून जुने विमानतळ पुनरुज्जीवित करावे, हा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. विमानतळ बचाव कृती समितीने त्याबाबत सांगलीकरांचे प्रत्यक्ष विमान पाहिल्याचे अनुभव पुराव्याच्या स्वरुपात जमवले आहेत. त्याला तांत्रिक आधार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *