हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
(political news) संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी फेटाळून लावला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुश्रीफ यांना तीन दिवसांची मुभा दिली. तसेच ईडीच्या कारवाईपासून याआधी देण्यात आलेले अंतरिम संरक्षण पुढील तीन दिवस कायम ठेवले.
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित कारवाईपासून उच्च न्यायालयाने ईडीला रोखले. त्यानंतर ईडीने या प्रकरणात मुश्रीफ यांच्या विरोधात ईसीआयआर दाखल करून चौकशीचा ससेमिरा मागे लावला. चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले.
मात्र मुश्रीफ यांनी ईडी चौकशीला न जाता ईडीलाच उच्च न्यायालयात खेचत याचिका दाखल केली. याची दखल घेत न्यायालयाने मुश्रीफ यांना अटकेपासून दिलासा देत अटकपूर्व जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुश्रीफ यांच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय मंगळवारी सायंकाळी घोषित केला.(political news)
प्रथमदर्शनी हसन मुश्रीफ यांनी शेअर सर्टिफिकेटचे आमिष दाखवून आणि शेअर्स होल्डर्स बनवून शेतकर्यांकडून पैसे जमा केले. मात्र ते पैसे मुश्रीफ यांच्या मुलांच्या नावे असलेल्या कंपन्यांच्या खात्यात वळते केले. यावरून हा शेड्युल्ड गुन्हा असल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यावेळी मुश्रीफ यांच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी किमान तीन दिवस अंतरिम संरक्षण कायम ठेवण्याची विनंती केली. त्याला ईडीच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. हितेन वेणेगावकर यांनी आक्षेप घेतला. मात्र न्यायालयाने मुश्रीफ यांची विनंती मान्य करीत ईडीच्या कारवाईपासून याआधी दिलेले अंतरिम संरक्षण 14 एप्रिलपर्यंत कायम ठेवले.