‘राजाराम’च्या अपात्र उमेदवारांचे अपील हायकोर्टाने फेटाळले

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (election) राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अपात्र उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या निर्णयाविरोधात परिवर्तन आघाडीच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहे.

बुधवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली ती दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होती. याचिकाकर्ते आणि विरुद्ध बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या 29 उमेदवारांनी कारखान्याच्या कराराचा भंग केला म्हणून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी 29 उमेदवारांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात संबंधितांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे दाखल केलेले अपीलही फेटाळण्यात आले. त्यानंतर याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.

उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वतीने सीनिअर अ‍ॅड. रवी कदम, सीनिअर अ‍ॅड. अनिल साखरे, अ‍ॅड. श्रीनिवास पटवर्धन यांनी; तर विरुद्ध बाजूने अ‍ॅड. जहागीरदार, अ‍ॅड. गिरीश गोडबोले यांनी युक्तिवाद केला.

आम्ही न्यायदेवतेच्या निर्णयाचा सन्मान करतो. सतेज पाटील यांनी आता ‘रडीचा डाव… रडीचा डाव’ म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असे सत्ताधारी आघाडीचे प्रमुख अमल महाडिक यांनी म्हटले आहे.

आम्ही कधीही सतेज पाटील यांच्यावर टीका केली नाही आणि ते मात्र प्रत्येकवेळी स्वतःची चूक लपवण्यासाठी आमच्यावर टीका करत आहेत. यावरूनच त्यांच्यात किती हिंमत शिल्लक आहे ते कळते, अशा शब्दांत अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना खडेबोल सुनावले.

जनतेच्या न्यायालयात सतेज पाटील पॅनेलचा विजय निश्चित

खोटी कागदपत्रे करून व सरकारी यंत्रणेवर दबाव टाकून महाडिक यांनी केलेली हुकूमशाही सभासद या निवडणुकीत (election) मोडून काढतील आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेल जनतेच्या न्यायालयात विजयी होईल, असा विश्वास परिवर्तन पॅनेलचे सर्जेराव माने यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *