सांगलीत पवारांच्या शिलेदाराने गड राखला
देशातील अग्रगण्य बाजार समिती मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपला परभावाचा धक्का बसला आहे. 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला खातंही उघडता आलेलं नाहीये. ही निवडणूक सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची झाल्यानं सांगलिकरांसोबतच राज्याचं या निवडणुकीकडं (election) लक्ष लागलं होतं. अखेर निकाल आता हाती आले आहेत. सांगली बाजार समितीमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे.
बड्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर महाविकास आघाडीने सांगलीत भाजपला धोबीपछाड देत एकहाती सत्ता मिळवली आहे.
पंकजांना धक्का
दरम्यान दुसरीकडे बीडच्या आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये (election) एकूण आठरा जागांपैकी तब्बल 15 जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखील लढवली होती. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून, भाजपचा पराभव झाला आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का माणला जात आहे.