कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर अचानक एकच धावपळ, नेमकं काय घडलं?
संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासन यांच्या आपत्ती प्रतिसाद कक्षाच्या वतीने सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिके (Demonstrations) पार पडली. दरवर्षी सांगलीकरांना महापुराचा धोका निर्माण होत असतो. अशावेळी यंत्रणा ही अपुरी पडत असते. यावेळेस यंत्रणा अपुरी पडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
प्रशासनाकडून तयारी सुरू
महापालिका प्रशासन संभाव्य मान्सूनपूर्व तयारीला लागले आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून कृष्णा नदीच्या पात्रात आपत्कालीन प्रात्यक्षिके (Demonstrations) घेण्यात आली. यावेळी संभाव्य पूर काळात जर पाण्यात कोणी बुडत असेल तर त्याचा बचाव कसा करावा? त्याला प्राथमिक उपचार कसे करावेत? यासह अनेक तत्कालीन बाबींचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. यावेळी यांत्रिक बोटीसहित आपत्तीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याने नदी पात्रात आपत्ती सेवेबाबत माहिती देण्यात आली.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संभाव्य आपत्ती आल्यास जिल्हा व महापालिका प्रशासन तसेच सर्व आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज राहतील, अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी महापालिका अग्निशमन दलाचे जवान, आपत्तीमित्र, वाईल्ड रेस्क्यू कंपनी, रॉयल कृष्णा बोट क्लब आणीन विश्वसेवा फाउंडेशन सांगली यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सांगली व परिसराला महापुराचा फटका
सांगली शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसत असतो. अशावेळी नागरिक अनेक भागांमध्ये अडकून पडतात. या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी तसेच येणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचाच भाग म्हणून सांगलीच्या कृष्णा नदीत आपत्कालीन यंत्रणांची प्रात्यक्षिके पार पडली.