BCCI घेणार मोठा निर्णय! विराट कोहली, रोहितला देणार डच्चू?

(sports news) भारतीय क्रिकेट संघाला 2013 पासून आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी स्पर्धा जिंकता आलेली नाही. बीसीसीआयकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. भारतामध्ये या वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या विश्‍वकरंडकानंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंची चर्चा करून त्यांना क्रिकेटच्या एका प्रकारामधून निवृत्त होण्यास सांगण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमधून हे वृत्त समोर आले आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या यादीत विराट कोहली व रोहित शर्मा या दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले की, भारतातील एकदिवसीय विश्‍वकरंडक आटोपल्यानंतर टी-२० क्रिकेटकडे लक्ष देण्यात येणार आहे. २००७ नंतर भारताने एकदाही टी-२० विश्‍वकरंडक पटकावलेला नाही. भारतातील आयपीएल स्पर्धेत युवा खेळाडू चमकत असतात. त्यानंतरही भारताला टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. ही बाब खटकणारी आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय निवड समिती योजना आखणार असून त्याची अंमलबजावणी एकदिवसीय विश्‍वकरंडकानंतर करण्यात येईल, असे ही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. (sports news)

हे खेळाडू रडारवर

भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू रडारवर असणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, रवीचंद्रन अश्‍विन, मोहम्मद शमी, भुवनेश्‍वरकुमार व के.एल.राहुल या खेळाडूंशी निवड समिती संवाद साधण्याची शक्यता आहे. विराट कोहलीची शारिरीक तंदुरुस्ती पाहता त्याला टी-२० क्रिकेटसाठी आणखी एक संधी देण्यात येऊ शकते.

२०२४ विश्‍वकरंडकासाठी संघ तयार करणे

निवड समितीकडून भारतातील एकदिवसीय विश्‍वकरंडकासाठी (२०२३) २० खेळाडूंची संभाव्य निवड करण्यात आली होती. आता निवड समितीला २०२४मध्ये वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकासाठी संभाव्य खेळाडूंची निवड करावयाची आहे. जेणेकरून स्पर्धा नजीक येईपर्यंत टीम इंडियाची संघ बांधणी झालेली असेल. यशस्वी जयस्वाल, ॠतुराज गायकवाड, रिंकू सिंग, रवी बिश्‍नोई यांसारख्या खेळाडूंना भारताच्या टी-२० संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *