जगाची चिंता वाढली! पुन्हा कोरोनाचा विळखा; मृतांच्या संख्येनं विक्रम मोडला

जगभरातील अनेक देशांमध्ये मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा जोर ओसरला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची (Coronavirus ) साथ जवळजवळ संपुष्टात आली आहे. मात्र आजही काही देशांवरील कोरोनाचं हे संकट कायम आहे. कोरोना व्हायरस ज्या देशातून जगभरामध्ये पसरला त्याच चीनमध्येही या संसर्गाचा धोका आजही कायम आहे. या देशात कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. चीनने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचे निर्बंध उठवले आहेत. मात्र हे निर्बंध उठवल्याने चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून जून महिन्यामध्ये कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचा आकड्यात मोठी वाढ झाली आहे. चीनमध्ये रोग नियंत्रण केंद्रांनी जून महिन्यात देशात कोरोनामुळे 239 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील 3 महिन्यांमधील हा सर्वोच्च आकडा आहे.

मार्च, एप्रिलमध्ये एकही मृत्यू नाही आणि आता…

चीनच्या पूर्वेकडील अनेक प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. मात्र यापैकी अनेक निर्बंध मागील महिन्याभरात टप्प्याटप्प्यात उठवण्यात आल्या. हे निर्बंध उठवल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढली. केवळ रुग्णसंख्याच नाही तर मृतांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये कोरोनामुळे 164 जणांचा मृत्यू चीनमध्ये झाला होता. मात्र निर्बंध उठवल्यानंतर या संख्येत वाढ झाल्याची माहिती चीनमधील रोग नियंत्रण केंद्रांनी दिली आहे. एप्रिल आणि मार्च महिन्यात चीनमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र अवघ्या 2 महिन्यांमध्ये हा आकडा 239 वर पोहोचला आहे.

निर्बंध उठवले की रुग्णसंख्या वाढते

चीनने 2020 च्या उत्तरार्धामध्ये झीरो कोव्हिड धोरण अवलंबलं होतं. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कठोर निर्बंध, लॉकडाऊन, क्वारंटाइन, देशांच्या सीमा बंद करणे, सक्तीच्या कोरोना (Coronavirus) चाचण्या यासारख्या उपाययोजना सरकारने केल्या होत्या. मात्र डिसेंबरपासून निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. त्यानंतर देशात तब्बल 60 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेले. वेळोवेळी या निर्बंधांमध्ये अधिक सूट देण्यात आली. मात्र सूट देताच रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या वाढत असल्याचं दिसून आल्याने अगदी 2023 च्या सुरुवातीपर्यंत अनेक गोष्टींसाठी सरसकट सूट देण्यात आलेली नव्हती. मागील काही महिन्यांमध्ये चीनमध्ये अनेक निर्बंध जवळजवळ पूर्णपणे शिथिल करण्यात आल्यानंतर अचानक मे महिन्यात रुग्णसंख्येचा एकप्रकारे विस्फोटच झाल्याचं पहायला मिळालं आहे.

सध्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी निर्बंधमुक्त पद्धतीने काय काय करता येईल याची चाचपणी सरकारी यंत्रणांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *