पुजारासह ‘या’ ५ खेळाडूंचे परतीचे दरवाजे बंद?
(sports news) भारतात अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सध्या बाहेर आहेत. त्यांची टीम इंडियामध्ये खेळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आता सन्मानाने निवृत्ती घेणे हाच एकमेव मार्ग उरला आहे. आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्येही निवड समिती युवा खेळाडूंवर अधिक अवलंबून राहू शकतात. अशा स्थितीत टीम इंडियामध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना चमकदार कामगिरी करत राहावे लागेल. बीसीसीआयने युवा खेळाडूंकडे लक्ष दिल्याने एकेकाळी टीम इंडियाचे स्टार परफॉर्मर असलेल्या खेळाडूंना कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण होणार आहे. अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. ज्यांना आता कसोटी संघात संधी मिळत नाही.
चेतेश्वर पुजारा :
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले. 35 वर्षीय पुजारासाठी आता संघात पुनरागमन करणे खूप कठीण असेल. पुजाराला यापूर्वी 2022 च्या दक्षिण आफ्रिका दौर्यानंतरही कसोटी संघातून वगळण्यात आले होते. तथापि, कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात परतला होता. भारतीय संघ व्यवस्थापनाने आता तिसर्या क्रमांकावर शुभमन गिलचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. गिलने डॉमिनिका कसोटीतही तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पुजाराने भारतासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत ज्यात 19 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.
वृद्धिमान साहा :
महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून खूप संधी मिळाल्या. मात्र, नंतर साहाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. वृद्धिमान साहा शेवटचा सामना 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळलेला वृद्धिमान साहा 38 वर्षांचा आहे. के.एस. भरत, इशान किशन आणि ऋषभ पंतमुळे साहासाठी संघात पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत. (sports news)
इशांत शर्मा :
एकेकाळी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य असायचा, पण आता त्याची कारकीर्द एकप्रकारे संपुष्टात आली आहे. इशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. इशांतने कसोटीत 311, एकदिवसीय सामन्यात 115 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 8 विकेटस् घेतल्या आहेत. त्याने नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारतीय संघ आता युवा वेगवान गोलंदाजांना संधी देत असल्याने 34 वर्षीय इशांत शर्माचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही.
करुण नायर :
भारताकडून आतापर्यंत फक्त दोनच त्रिशतके झाली आहेत. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त करुण नायरच्या नावावर त्रिशतकाची नोेंद आहे. मात्र, त्या त्रिशतकानंतर 31 वर्षीय करुण नायरचा आलेख वाढण्याऐवजी घसरतच राहिला. करुण नायर 2017 मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. करुण आता देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाही, त्यामुळे त्याचे पुनरागमन खूप कठीण आहे. करुणने भारतासाठी सहा कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.
भुवनेश्वर कुमार :
‘किंग ऑफ स्विंग’ म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याला कसोटी क्रिकेट खेळून पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता भुवीचे टीम इंडियात पुनरागमन खूप कठीण दिसत आहे. 2013 मध्ये भारताकडून पदार्पण केल्यानंतर भुवनेश्वर सतत दुखापतींशी झुंज देत आहे. 33 वर्षीय भुवीने केवळ 21 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 26.1 च्या सरासरीने 63 विकेटस् घेतल्या.