देशात व महाराष्ट्रात एनडीएला किती जागा मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आकडाच सांगितला
(political news) एकीकडे विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात मोट बांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही विरोधकांच्या विरोधात आपलं बळ उभं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काल दोन्ही आघाड्यांची बैठक पार पडली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात बंगळुरू येथे विरोधकांची बैठक पार पडली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसने इंदिरा गांधींसाठी दिला होता. तोच नारा मोदींसाठी दिला. मोदी म्हणजे इंडिया. इंडिया म्हणजेच मोदी, असा नाराच एकनाथ शिंदे यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बैठक झाली. सगळ्यांनी मोदींना खंबीर पाठिंबा दिला. मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताचा नावलौकीक जगभर वाढला आहे. जागतिक लीडर म्हणून जगभरातील नेते मोदींकडे पाहत आहेत. आगामी काळात मोदीच या देशाला आणखी सक्षमपणे पुढे नेऊ शकतात. आजच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी मोदींवर विश्वास दाखवला. महाराष्ट्राच्यावतीने आम्ही त्यांना अश्वस्त केलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात 45 जागा येणार
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार 45हून अधिक जागा निवडून आणेल. त्यामुळे केंद्र सरकारला पाठबळ मिळेल. महाराष्ट्रात क्लीन स्वीप मिळेल. राज्यातील जनता केलेल्या कामाची पावती देईल. महाराष्ट्र नेहमीच मोदींच्या पाठिशी राहिला आहे. यावेळीही राहील, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
330 जागा निवडून येतील
देशात लोकसभेला एनडीएच्या 330 जागा निवडून येऊ शकतात. इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजे मोदी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांना त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवता आला नाही. एक नेता ते ठरवू शकले नाहीत. विकास करायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, असं विरोधक खासगीत कबूल करतात, असंही त्यांनी सांगितलं. (political news)
मोदींच्या रांगेत शिंदे
दरम्यान, काल एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामध्ये बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं होतं.