‘इंडिया’ नावामुळे राजकीय वादंग; चर्चा न झाल्याने काही पक्ष नाराज
(political news) २६ विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुजिव्ह अलायन्स (इंडिया) असे नाव देण्यात आले आहे. मात्र या आघाडीला ‘इंडिया’ नाव देणे अयोग्य असल्याचे त्यातील काही घटक पक्षांच्या नेत्यांचे मत आहे. इंडिया हे नाव जाहीर करण्याआधी त्याबाबत घटक पक्षांशी सविस्तर चर्चा करायला हवी होती असेही या नेत्यांना वाटते. इंडिया नावावर भाजपप्रणित एनडीएनेही टीका केली होती.
विरोधी पक्षांच्या नेत्यांची बंगळुरू येथे बुधवारी बैठक सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ‘चक दे इंडिया’ असे ट्वीट केले होते. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे खासदार माणिक टागोर यांनी जितेगा इंडिया असे ट्विट केले. उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये इंडिया या शब्दाचा तीनदा वापर केला. या सर्व ट्वीटमुळे गोंधळ निर्माण झाला. इंडिया असे नाव दिल्याने नितीशकुमार नाराज झाले नाहीत, असे जनता दल (यू)चे अध्यक्ष ललनसिंह यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बंगळुरू येथील बैठकीला उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने असा दावा केला की, आघाडीला काय नाव द्यायचे यावर सविस्तर चर्चा झाली होती. सरतेशेवटी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया या नावाचा आग्रह धरला व तो इतर घटक पक्षांनी मान्य केला. (political news)
‘जीतेगा भारत’ टॅगलाइन
विरोधी पक्षांनी आघाडीसाठी ‘इंडिया’ नावाची घोषणा केल्यानंतर एका दिवसाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘जीतेगा भारत’ ही टॅगलाइन निवडली आहे.
सूत्रांनी सांगितले की, ही टॅगलाइन बहुधा विविध प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करून वापरली जाईल. मंगळवारी बंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांना वाटले की आघाडीच्या नावात ‘भारत’ हा शब्द देखील समाविष्ट करावा. त्यामुळे त्याचा वापर टॅगलाइनमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.