ऑगस्टमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद; आतच पाहून घ्या ‘बँक हॉलिडे’ची यादी

‘तुम्हाला काय… सगळ्या सुट्ट्या मिळतात’, असं म्हणत तुम्हीही अनेकदा एखाद्या ओळखीतल्या आणि त्यातही बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून असं काहीतरी म्हटलं असेल. आता तर, तुम्हाला असं म्हणायला निमित्तच मिळणार आहे. कारण, येत्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात बँकांना साधारण 14 ते 15 दिवसांची सुट्टी (holiday) असणार आहे. त्यामुळं तुमचीही बँकांशी संबंधीत काही कामं असल्यास आताच ती कोणत्या दिवशी उरकायची हे ठरवा. म्हणजे आयत्या वेळी अडचणींचा सामना करायला नको.

बँक, दैनंदिन आयुष्याशी थेट संबंध असणाऱ्या या संस्था. जिथं तुम्हाला बहुविध कारणांनी आर्थिक व्यवहारांची परवानगी आणि मुभा देण्यात येते. घराचं कर्ज असो किंवा मग निवृत्तीवेतनाचे पैसे काढणं असो, एखादा विमा उतरवणं असो अशा एक ना अनेक कामांसाठी बँकेची वाट आपण अनेकजण धरतो. ऑगस्ट महिन्यात मात्र बँकेत नेमकं कधी जायचंय हे सुट्ट्यांची यादी बघूनच ठरवा. कारण, भारतीय रिजर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) देशातील बँकांना ऑगस्ट महिन्यासाठी काही सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या सुविधांसाठी आरबीआयकडून ही यादी सार्वजनिकरित्या जाहीर केली जाते. याच यादीत दिसत असल्यानुसार ऑगस्ट महिन्यात 14 दिवस बँका बंद असतील.

दरम्यान, पुढचा महिना बँकांसाठी सुट्ट्याचा (holiday) महिना आहे असंच म्हणावं लागेल. कारण, अनेक सणवार, जयंती आणि आठवडी सुट्ट्या पकडून अनेक दिवसांना बँका बंद असतील. देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2023 लासुद्धा बँका बंद राहतील.

चला पाहुया ऑगस्ट महिन्यासाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी…

6 ऑगस्ट 2023 – रविवार, बँकांची आठवडी सुट्टी
8 ऑगस्ट 2023 – गंगटोकमध्ये तेन्दोंग ल्हो रम फातमुळं बँका बंद
12 ऑगस्ट 2023 – दुसरा शनिवार, बँकांना सुट्टी
13 ऑगस्ट 2023 – रविवार, बँकांची आठवडी सुट्टी
15 ऑगस्ट 2023 – स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, देशभरातील बँका बंद
16 ऑगस्ट 2023- पतेती, पारसी नववर्षामुळं मुंबई, नागपूरसह इतर भागांमध्ये बँका बंद
18 ऑगस्ट 2023 – श्रीमंत शंकरदेव तिथीमुळं गुवाहाटीमध्ये बँका बंद
20 ऑगस्ट 2023 – रविवारच्या आठवडी सुट्टीमुळं बँकांना टाळं
26 ऑगस्ट 2023 – चौथा शनिवार, बँकांची आठवडी सुट्टी
28 ऑगस्ट 2023 – ओणममुळं कोच्ची आणि तिरुवअनंतपूरम येथे बँकांना रजा
29 ऑगस्ट 2023 – तिरुओणमच्या निमित्तानं कोच्ची आणि तिरुवअनंतपूरम येथे बँकांना सुट्टी
30 ऑगस्ट 2023 – रक्षा बंधननिमित्तानं शिमला, जयपूर आणि देशातील इतर काही राज्यांमध्ये बँकांना रजा
31 ऑगस्ट 2023 – रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लहबसोल निमित्तानं गंगटोक, कानपूर, कोच्ची, तिरुवअनंतपूरम, देहरादून येथील बँकांना सुट्टी.

पुढच्या महिन्यात बँका बंद असल्या तरीही ऑनलाईन पद्धतींनी मात्र बँकांची सेवा सुरु असेल. त्यामुळं इथं तुम्ही आवश्यक ते व्यवहार करु शकता. याशिवाय रोकड काढण्यासाठी तुम्ही एटीएमचीही मदत घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *