शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना प्रशासनाकडून नोटिसा

शिरोळ तालुक्यातील पूरबाधित ४२ गावांतील सुमारे ३७ हजार पूरग्रस्त कुटुंबांना प्रशासनाकडून (administration) नोटिसा बजावण्याच्या हालचाली सुरू आहेत. महापुराच्या काळात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना या नोटिसीत करण्यात येणार आहेत.

महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. गेल्या काही वर्षांतील महापुराचे अनुभव लक्षात घेता प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

तालुक्यात सध्या तरी पूरस्थिती नसली तरी परिस्थिती पाहून नोटिसा लागू केल्या जाणार आहेत. इतर वेळी जीवनदायिनी ठरणाऱ्या तालुक्यातील चार नद्या पावसाळ्यात मात्र धडकी भरविणाऱ्या ठरत आहेत.

नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसतो. २००५, २०१९ आणि २०२१ च्या महापुराचे पूर्वानुभव लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. महापुराआधी या गावातील ३७ हजार कुटुंबांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. पशुधनाचीही विशेष काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

‘संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर गतवेळचे अनुभव लक्षात घेता पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन पुरेशी खबरदारी घेत आहे. त्याचाच भाग म्हणून शिरोळ तालुक्यातील ४२ गावांमधील कुटुंबांना परिस्थितीनुसार नोटिसा लागू केल्या जाणार आहेत. पावसाचा अंदाज, धरणातील पाणीसाठा, नद्यांच्या पाण्याची पातळी यावर प्रशासनाचे (administration) लक्ष असून सूचनांचे पालन करून पूरबाधित गावांमधील ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

अनिलकुमार हेळकर, तहसीलदार, शिरोळ

‘शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावांमध्ये ग्रामस्थांना प्रशासनामार्फत सुरक्षिततेच्या भावनेतून यंत्रणेमार्फत आवाहन केले जात आहे. गावागावांतील घंटागाड्यांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत. पूरबाधित गावांमधील कमकुवत असणाऱ्या घरांच्या मालकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ग्रामस्थांनी सहकार्य करावे.

शंकर कवितके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरोळ

महापुराची तयारी दृष्टिक्षेपात

बाधित गावातील पाईपलाईन दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर

बेटांचे स्वरूप प्राप्त होणाऱ्या गावांसाठी पुरेसा औषध साठा

पशुवैद्यकीय दवाखानामध्ये जनावरांसाठीही औषधांचा साठा

गटर्समधील गाळ काढून प्रवाहित केले जाणार

फॉगिंग मशीन दुरुस्तीच्या सूचना

पुरेशा कीटकनाशकांची खरेदी करण्याच्याही सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *