जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये तात्काळ निवारा शेड उभे करून जीवनाश्यक सुविधा पुरविण्याची ‘वंचित’ची मागणी

कुरुंदवाड/प्रतिनिधी:

कोल्हापूर सांगली येथील पूर (flood) परिस्थिती टाळण्यासाठी छोट्या – मोठ्या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग व धरणक्षेत्रात ( कॅचमेंट एरियात ) पडणारा पाऊस याचे योग्य नियोजन करावे व अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा तसेच संभाव्य पुरपरिस्थिती पाहता जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये तात्काळ निवारा शेड उभे करून जीवनाश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली. मागणीचे निवेदन वंचितचे कोल्हापूर.( उ ) चे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वाढता पाऊस पाहता व नदीला आलेले पावसाचे पाणी यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील छोटी-मोठी जी धरणे आहेत त्यातून होणाऱ्या विसर्गाचे योग्य नियोजन करावे व कॅचमेन्ट एरियात पडणारा पाऊस विचारात घेऊन धरणातून होणारा पाण्याचा विसर्गावर नियंत्रण ठेवावे.

पूरपरिस्थिती गंभीर होण्या पाठीमागे अलमट्टी धरण हे कारण जरी पुढे येत असले तरी प्रशासनाकडून वर नमूद केलेल्या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने धरणे ओव्हरफ्लो होऊन नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामध्ये धरण परिसरामध्ये पडलेला पाऊस (कॅचमेन्ट एरिया) त्याचा विसर्ग हे दोन्ही एकत्र आल्यामुळे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर होत आलेली आहे. हवामान खात्याचा अंदाज पाऊस किती पडणार याचा ताळमेळ करून धरणातून अगोदरच विसर्ग करावा तर कदाचित काही अंशी पूर परिस्थितीवर मात करता येईल.

संभाव्य पूर (flood) परिस्थितीचा विचार करता पूरग्रस्त गावात स्वतंत्र छावण्या उभे करून पूरग्रस्तांना सर्व सुविधा पुरवाव्यातत, स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र छावणी असावी, त्या ठिकाणी आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात, पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करावी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करीत आहोत. तसेच यावर्षी पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सचिव स्तरावरील बैठक झाली नाही, ती बैठक तात्काळ घेऊन महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य समन्वय्याने काम करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अशी विनंतीही निवेदनात केली आहे.
———
विलास कांबळे
जिल्हाध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूर (उ)
संजय सुतार
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूर (उ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *