राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते (political leader) राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राजू शेट्टी 5 दिवसांपूर्वी बुलडाण्यात येऊन गेले. मात्र, आम्हाला निरोप किंवा फोनही केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली आहे. आपला केसांनी गळा कापला जातो, असा आरोप करीत तुपकर पुन्हा वेगळी चूल मांडण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा धक्का समजला जात आहे.
दरम्यान, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी हा वाद पक्षांतर्गत असून, हे पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.
बुलडाणा येथे रविकांत तुपकर यांनी बुधवारी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. याबाबत तुपकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, स्वाभिमानीला बुलडाण्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या दौर्यात आम्हाला सोबत घेणे गरजेचे होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी आहे. राजू शेट्टी व माझ्यात कोणतेही भांडण नाही. चळवळीमध्ये काम करीत असताना ज्या कार्यकर्त्यांनी चळवळीला वेळ दिला, घरादारावर तुळशी पत्रे ठेवली, अशा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे.
समज-गैरसमज दूर होतील
दरम्यान, याबाबत (political leader) राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीमध्ये वाद असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. बुलडाणा जिल्ह्यातील काही पदाधिकार्यांमध्ये वाद आहे; पण तो फार महत्त्वाचा नाही. रविकांत तुपकरांची काही नाराजी असेल, तर त्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी येत्या 8 किंवा 10 तारखेला समितीसमोर म्हणणे मांडावे. या बैठकीमध्ये समज-गैरसमज दूर होतील आणि हे पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल.