मोदींनी घोषणा केलेली पीएम विश्वकर्मा योजना नेमकी काय? कोणाला मिळणार फायदा?

पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी खास आखलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा (scheme) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ करण्यात आला. याशिवाय देशी बनावटीच्या व ५,४०० कोटी रुपये खर्चाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटरच्या (आयआयसीसी) यशोभूमी या पहिल्या टप्प्याचेही मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. येथील द्वारका येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विश्वकर्मा जयंतीच्या औचित्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘व्होकल फॉर लोकल हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे आता सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात नागरिकांनी प्रामुख्याने स्थानिक व्यावसायिकांकडूनच खरेदी करावी’, असे आवाहन या योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी यांनी केले. तसेच, ‘जीएसटी अंतर्गत नोंदणी झालेल्या पुरवठादारांकडूनच आपला कच्चा माल घ्यावा’, असे आवाहन मोदी यांनी कारागिरांना केले. ‘या प्रकल्पातून लाखो रोजगार उपलब्ध होतील’, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
योजनेचे लाभ काय?
विश्वकर्मा योजनेत (scheme) १८ पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला असून, त्यासंबंधी एका ई-बुकलेटचेही मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या योजनेनुसार कोणत्याही हमी वा तारणाविना कारागीर व श्रमिकांना दोन हप्त्यांत एकूण तीन लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल. यातील पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांचे अर्थसाह्य मिळणार असून, त्याची परतफेड १८ मासिक हप्त्यांत करायची आहे. या कर्जाचा दुसरा टप्पा दोन लाख रुपयांच्या स्वरूपात असून त्याची परतफेड ३० मासिक हप्त्यांद्वारे करावी लागेल. विशेष म्हणजे, या लाभार्थी कर्जदारांकडून अत्यल्प म्हणजे पाच टक्के दराने व्याजाची आकारणी केली जाणार आहे. उर्वरीत आठ टक्के व्याजाचा भार सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसाय मंत्रालय उचलणार आहे. या कर्जाचे पतहमी शुल्कही केंद्र सरकारच भरणार आहे.
योजनेचे उद्दिष्ट काय?
पारंपरिक कारागीर व शिल्पकारांना सुलभ अर्थसाह्य करणे व त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच, आपल्या देशातील पारपंरिक कुशल व्यवसायांचा वारसा पुढे नेणे हेही यातून साधले जाणार आहे. तब्बल ८.९ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर यशोभूमी प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम १.८ लाख चौरस मीटरवर झाले आहे. व्यावसायिक बैठका, परिषदा, प्रदर्शने यासाठीचा हा जगातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. यशोभूमी द्वारका सेक्टर २५ या नव्या स्थानकाद्वारे या प्रकल्पाचे ठिकाण दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस मार्गिकेस जोडला गेला आहे.
मोदी म्हणाले…
– शरीरात पाठीचा कणा ज्याप्रमाणे महत्त्वाचा असतो, तशीच सामाजिक जीवनात विश्वकर्मांची भूमिका असते. त्यांच्या योगदानाशिवाय जगण्याची कल्पना करणे कठीण.
– आपल्या हातांनी व उपकरणांच्या साह्याने व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही योजना आशेचा किरण आहे.
– फ्रिजच्या काळातही सर्वांना माठातील पाणी पिणे आवडते. त्यामुळे या प्रकारच्या कारागिरांचे महत्त्व कधीच संपणार नाही.
– समाजात ज्यांना मानाचे स्थान दिले जात नाही, त्या वर्गाचा सेवक म्हणून मी आलो आहे.