शौमिका महाडिक यांनी शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मागणी

(political news) ‘संचालकांवर होणारा ३० लाखांचा खर्च ५० लाखांवर गेला आहे. संघाच्या जीवावर स्वत:च्या चैन्यांसाठी शेतकऱ्यांचे खिसे कापणे बंद करून कपात केलेला गाय दूध दर पुन्हा वाढवून दिला पाहिजे. दर वाढवला नाही तर शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढली जाईल. सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांनी काटकसर करून कपात केलेली रक्कम गेली काोठे,’ असा सवाल ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाडिक म्हणाल्या, ‘सत्ताधाऱ्यांना गाय दुधाचा कपात केलेला दर वाढवायचा नाही. इतर संघांपेक्षा गोकुळचा दर जास्त असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, इतर संघांपेक्षा जिल्ह्यात दूध उत्पादकांची गोकुळसोबत नाळ जोडली आहे. विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी दूध खरेदी दर वाढवला असतानाही विक्री दर वाढवला नाही. त्यानुसार बाहेरील राज्यातील दूध खरेदीचे दर कमी करून केवळ कोल्हापूर जिल्ह्यात कपात केलेला दर वाढवला पाहिजे.

शेतकरी स्वत: आंदोलन हातात घेत आहेत. दूध उत्पादकांनीही संघाच्या कार्यालयाची मोडतोड न करता रास्त मार्गाने आपला दर मिळवला पाहिजे. भविष्यात शेतकरी जो निर्णय घेतील, त्यासोबतच आपण असणार आहे. ३०-३५ वर्षांच्या काळात आम्ही संघ तोट्यात आहे, अशी कारणे सांगून शेतकऱ्यांचा खिसा कापला नाही. गोकुळचे पदार्थ सर्वात दर्जेदार आहेत. सर्व व्यवहार रोखीने होतात. सत्ताधाऱ्यांचे नेते काटकसर करून पैशांची बचत केल्याचे सांगत आहे. ही बचत केलेली रक्कम गेली काोठे?’

* २७ लाख पॅकेजचा अधिकारी काय कामाचा?

‘गोकुळमधील कामाचा गोल्डन फायदा घेऊन निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला २७ लाखांचे पॅकेज देऊन पुन्हा मार्केटिंगसाठी आणले आहे. शेतकऱ्यांना दोन रुपये वाढ देता येत नाहीत, मात्र ज्या अधिकाऱ्यामुळे कोणताही फायदा होणार नाही, असा अधिकारी कोणाच्या फायद्यासाठी आणून बसवला आहे,’ असा सवालही महाडिक यांनी केला. ‘संघातील भेटीगाठी किंवा इतर कामानिमित्त येणाऱ्या अधिकाऱ्यांना एका हॉटेलमध्ये थांबवण्याची नवीन प्रथा सुरू केली आहे. त्याच हॉटेलमध्ये राहून संघाचे काय भले होणार आहे?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (political news)

* गाय दूध संकलन वाढले, पण…

‘गाय दूध दर कपात केल्यापासून दुधाचे संकलन घटले नाही. याउलट १५ हजार लिटरने वाढले असल्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले; मात्र हे कोल्हापूर जिल्ह्यात किती वाढले, हे सांगितले नसल्याचेही महाडिक यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *