ड्रग्ज प्रकरणाचा आज उलगडा होणार; देवेंद्र फडणवीस मोठा खुलासा करणार?

ललित पाटील ड्रग्ज (drugs) प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. अंधारे यांनी मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नावे देखील घेतली आहेत. नेमक्या याच विषयावर गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.

यावेळी दोन्ही मंत्र्यांनी चुप्पी साधल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, याच प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पत्रकारपरिषद घेणार आहेत. त्यामुळे फडणवीस आज कोणता मोठा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अगदी दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील सापडला आहे, राज्यातील ड्रग्ज प्रकरणात एक मोठं रॅकेट समोर येणार, अनेक गौप्यस्फोट होणार, असं म्हटलं होतं. फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे आज ते कोणता मोठा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी आपली जाहीर माफी मागावी, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार, असा इशारा मंत्री शंभुराजे देसाई आणि दादा भुसे यांनी दिला आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा दोन्ही मंत्र्यावर हल्लाबोल केलाय.

शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांच्यासोबत माझं वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या खात्याशी संबंधित जर विषय असेल तर त्यांनाच विचारणार. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाईंकडे आहे. तो विभाग सपशेल अपयशी आहे. मी जे काल बोलले, त्यामधून मी एक ही शब्द मागे घेणार नाही. माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयातून पसार झालेला अंमली पदार्थ (drugs) तस्कर ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी त्याच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ललितला बंगळुरुमधून पकडले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी बारकाईने तपास करीत त्याच्या मैत्रिणींना बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *