साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणार

मंत्री समितीच्या बैठकीत साखर कारखान्यांना 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम (Fall season) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बुधवारपासून राज्यासह जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत आहे. जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक साखर कारखान्यांनी गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यात साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत. यामुळे कारखाना कार्यस्थळी लगबग वाढली आहे. उसाच्या कमतरतेमुळे यावर्षी 90 दिवस कारखाने चालतील, असे वर्तवले जात आहे.

हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात गाळपासाठी 135 लाख मेट्रिक टन व सांगली जिल्ह्यात 78 लाख मेट्रिक टन, असा एकूण 213 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. मोळी टाकून हंगाम (Fall season) शुभारंभ करताना काही कारखानदारांनी 3,001 रुपये, तर काही कारखानदारांनी 3,100 रुपये एफआरपी देऊ, असे जाहीर केले आहे.

यावर्षी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. याचा परिणाम उसाच्या वाढीवर झाला आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात 30 टक्के घट होणार आहे. त्याचा फटका साखर उत्पादन घटण्यावर होणार आहे. साखर उत्पादन घटल्यास त्याचा आर्थिक बोजा कारखान्यांवर पडणार आहे.

पाणी संकट

पाऊस कमी झाल्याने पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाण्याचे आवर्तन सुरू होण्याची शक्यता आहे.

उसाची पळवापळवी होणार

कारखान्यांची वाढलेली संख्या, उसाच्या क्षेत्रात झालेली घट, यामुळे उसाचे उत्पादन घटत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने उत्पादन घटणार आहे, त्यामुळे उत्पादनात 30 ते 35 टक्के घट होण्याची शक्यता आहे. कारखाने जास्तीत जास्त 90 ते 95 दिवस चालू शकतील, असा अंदाज आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *