थंडीत लहान मूले आजारी पडतात? मग ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी
बदलत्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आता थंडीची (winter) नुकतीच सुरूवात झाली असल्यामुळे प्रौढ आणि लहान मुलांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. हवामान बदलले की, मोठ्यांसोबत लहान मुलांना सुद्धा सर्दी-खोकला, ताप आणि अंगदुखी इत्यादी समस्या सुरू होतात.
पावसाळा आणि हिवाळा सुरू झाला की, लहान मुलांना विशेषत: सर्दी-खोकला, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार होतात. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे, मुले लगेच या आजारांना बळी पडतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये पालकांनी लहान मुलांची खास काळजी घेणे गरजेचे आहे.
या दिवसांमध्ये (winter) मुले आजारी पडू नये यासाठी मुलांचा योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना विविध समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.
पुरेशी झोप
चांगल्या आरोग्यासाठी नीट झोप घेणे अतिशय महत्वाचे आहे. लहान मुलांनी देखील पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. खास करून १२ वर्षांखालील मुलांनी किमान ९ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, मुलांचा मूड चांगला राहतो आणि त्यांना आवश्यक ऊर्जा देखील मिळते. त्यामुळे, पालकांनी लहान मुलांच्या झोपेकडे नीट लक्ष द्यायला हवे.
संतुलित आहाराची जोड
लहान मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी संतुलित आहार अतिशय महत्वाचा आहे. या संतुलित आहारामध्ये सर्व पोषकघटकांचा समतोल असणे गरजेचे आहे. प्रथिने, कर्बोदके, फायबर्स आणि जीवनसत्वे हे सर्व घटक त्यांच्या आहारामध्ये असायला हवेत.
त्यासोबतच हिरव्या भाज्या, दूध, अंडी आणि कडधान्ये इत्यादी पौष्टिक आहारामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. शिवाय, योग्य संतुलित आहार घेतल्यामुळे लहान मुले कमी आजारी पडतात आणि लवकर बरी देखील होतात. त्यामुळे, लहान मुलांच्या संतुलित आहाराची पालकांनी विशेष काळजी घ्यावी.
व्यायाम आहे महत्वाचा
चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे, हिवाळा असो किंवा पावसाळा आपण प्रत्येक ऋतुमध्ये व्यायाम केलाच पाहिजे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे.
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणे फायदेशीर ठरते. व्यायामामुळे शरीरात चांगले हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे, मूड सुधारतो.
लहान मुलांनी सकाळच्या वेळेत व्यायाम केल्याने शरीराला बळकटी मिळते आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी तयार होते. त्यामुळे, लहान मुलांनी नियमितपणे व्यायाम करायला हवा आणि खेळायला हवे.