शिंदे गटाचे निम्मे खासदार ‘डेंजर झोन’मध्ये?
(political news) आगामी लोकसभा निवडणुकांत नेत्रदीपक कामगिरी नोंदवत पुनश्च मोदी सरकार सत्तेमध्ये आणण्याचा चंग बांधलेल्या भाजपने सर्वेक्षण मालिकेचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रात २०१४ आणि २०१९ मध्ये मिळवलेल्या देदीप्यमान विजयाची २०२४ मध्ये पुनरावृत्ती करण्यासाठी तूतार्स पोषक वातावरण असले तरी सवंगड्याच्या भूमिकेत असलेल्या शिंदे सेनेतील काही चेहरे बदलण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागणार असल्याचा धक्कादायक मुद्दाही सर्वेक्षणात पुढे आला आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गटाला विद्यमान चौदापैकी पाच ते आठ चेहरे वगळून तिथे नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
पुढील लोकसभा निवडणूक २०२४ च्या एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. मागील दोन निवडणुकांत मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा सिद्ध झाल्यानंतर आताही त्याची पुनरावृत्ती करण्याचा भाजपने निर्धार केला आहे. २०१९ मध्ये भाजपने तत्कालीन परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात तब्बल ४१ जागांवर विजय प्राप्त केला होता. कालौघात, महाविकास आघाडीचे सरकार पदच्युत होऊन शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपप्रणीत सरकार प्रस्थापित झाले. या प्रक्रियेत मूळ शिवसेनेतील ४० आमदार आणि चौदा खासदारदेखील शिंदेंना येऊन मिळाले. शिवसेनेमधील अंकाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊन चाळीस आमदारांचा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये समाविष्ट झाला. स्वाभाविकच, लोकसभेसोबत सर्वच निवडणुका सोबत लढणे भाजपसह तीनही पक्षांना क्रमप्राप्त ठरणार आहे.
याच अपुषंगाने पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांत जनतेचा मूड काय आहे, हे भाजपने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार तब्बल ४२ लोकसभा क्षेत्र मोदींच्या नेतृत्वाला पसंती देणार असल्याचा निष्कर्ष निघत असतानाच स्थानिक खासदारांवर मात्र जनता रुसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या या सर्वेक्षणाने शिंदे गटाच्या पाच ते आठ खासदारांची झोप उडवली आहे. संबंधित खासदारांची कामगिरी, जनाधार आणि तत्सम बाबी त्यांच्या आणि पयार्याने भाजपच्या इराद्याला छेद देऊ शकतो. ही बाब भाजपने एकनाथ शिंदे यांच्या कानी घातल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, सर्वेक्षणात डेंजर झोनमध्ये असलेल्या खासदारांमध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन तसेच मराठवाडा आणि मुंबईतील एक अशा सात जणांचा समावेश आहे. यावर शिंदे आणि भाजप नेमका काय तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (political news)
यांचा प्रवास होऊ शकतो खंडित …
भाजप सर्वेक्षणातील मुद्दा प्रमाण मानल्यास शिंदे गटाचे विदर्भात कृपाल तुमाने (रामटेक), भावना गवळी (वाशिम- यवतमाळ), प्रतापराव जाधव (बुलढाणा), उत्तर महाराष्ट्रात हेमंत गोडसे (नाशिक) व सदाशिव लोखंडे ( शिर्डी), मराठवाड्यात हेमंत पाटील (हिंगोली), तर मुंबईतून राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई) व गजानन कितर्पकर (उत्तर पश्चिम मुंबई) यांचा समावेश आहे. कठीण काळात मातोश्रीला अव्हेरून आपल्यासोबत आलेल्या या बिनीच्या शिलेदारांना उद्याच्या प्रसंगात खाली बस म्हणायचे धाडस एकनाथ शिंदे करतात की येनकेन प्रकारे त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.