मिरज सिव्हिलमध्ये मिळणार अत्याधुनिक उपचार
गरजू रुग्णांना मोठा आधार असणार्या मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये (government hospital) अनेक विभाग हायटेक होत आहेत. या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती सुरू झाली आहे.
रुग्णालयात ईको कार्डिओ मशीन सुरू झाले आहे. डोळ्यांचे फेको तंत्रज्ञानाचे नवीन मशीन आले आहे. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी सर्जरी सुरू झाली आहे. न्यूरो सर्जरी मशीन देखील रुग्णालयास मिळणार आहे. आंतररुग्ण विभागामध्ये रिमोटवर चालणारे बेड आले आहेत.
मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातूनही अनेक गरजूंना येथे मोठी आरोग्य सेवा दिली जाते. गरजू रुग्णांना हे रुग्णालय मोठा आधार आहे. अनेक उपचार येथे मोफत व अत्यल्प दरामध्ये असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होतो. या रुग्णालयामध्ये दररोज सुमारे सातशे ते 1000 रुग्णांची बाह्य रुग्ण विभागामध्ये तपासणी केली जाते.
महाराष्ट्रात कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये (government hospital) स्कील लॅब नव्हती. त्यामुळे एमबीबीएस व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचूनच प्रशिक्षण दिले जात होते. मात्र आता मिरजेतील शासकीय रुग्णालयात स्कील लॅब झाल्याने उपचाराबाबत प्रॅक्टिस करून प्रशिक्षण घेतले जात आहे. हे रुग्णालय सौरऊर्जेवर चालण्याससाठी जिल्हा नियोजन मंडळातून तीन कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. संपूर्ण रुग्णालय व विद्यार्थ्यांचे वसतिगृह या सौरऊर्जेवर चालणार आहे.
येथे नव्याने वसतिगृह बांधण्याची गरज होती. त्यानुसार केंद्र शासनाने 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 2 वसतिगृहे, 2 प्रॅक्टिकल हॉल, 2 लेक्चर हॉल बांधण्यात येत आहेत. वसतिगृहामुळे सुमारे 400 विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. ग्रंथालय अद्ययावत करण्यासाठी बांधकाम सुरू आहे.
राज्य शासनाने भुयारी गटार व सांडपाणी निचरा करण्यासाठी सुमारे 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र त्यासाठी अधिकचा निधी लागणार आहे. त्यासाठी नव्याने मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रुग्णालयातील अग्निशमन विभागही सुधारण्याची गरज होती. त्यासाठीही शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. येथे कान-नाक-घसा याच्या उपचारासाठी अत्याधुनिक डेरा मशीन व मायक्रोस्कोप मशीन आली आहे.
जिल्हा नियोजन मंडळाकडून औषधे
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे म्हणाले, शासकीय रुग्णालयामध्ये औषधे कमी पडू नयेत यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन औषधे उपलब्ध केली आहेत. ती औषधे मार्चपर्यंत पुरतील इतकी आहेत. हाफकिनकडून मात्र अद्याप औषधे उपलब्ध झालेली नाहीत. ती उपलब्ध होणे गरजेचे आहे.