मिरजेत 40 कोटींतून काय उभे राहिले?

राज्य सरकारने मिरजेच्या जनतेला दिलेल्या सुमारे 40 कोटी रुपयांच्या निधीतून ठेकेदार पोसण्याचे काम झाले. काही निधींचा अपव्यय झाला. काही निधी (funding) काम सुरू न झाल्याने पाच वर्षे पडून आहे.

राज्यात भाजपचे सरकार असताना 2019 मध्ये महापालिका निवडणूक झाली होती. त्यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ताब्यात घेण्याचा चंग बांधला होता. त्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आली. सरकारने सांगली मिरजेच्या जनतेसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता. निवडणुकीमध्ये भाजप जिंकल्याने महापालिकेला विकास कामे करण्यासाठी ते बक्षीसच होते. त्या निधीपैकी सुमारे 40 कोटी रुपयांचा निधी मिरजेसाठी सध्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने मिळाला होता. त्यापैकी अनेक कामे हाती घेण्यात आली. काही कामे पूर्णही झाली. काही कामे अपूर्ण राहिली तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाली तर काही कामे सुरूच झाली नाहीत. त्यांचा निधी पडून आहे.

लक्ष्मी मार्केटच्या नुतनीकरणाचेही काम हाती घेण्यात आले. त्यासाठी सुमारे 1 कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला. यामध्ये रुफिंग व फ्लोरिंग अशी दोन मुख्य कामे सुरू करण्यात आली. संबंधित ठेकेदाराने रुफिंगचे काम पूर्ण केले. फ्लोरिंगसाठी फरशी कामाच्या ठिकाणी येऊन पडली. त्याचे कटींगही केले. मात्र हे काम सुरू होण्यापूर्वी येथे पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काम थांबले. पावसाचे पाणी बाहेर काढता येत नाही. हे काम पूर्ण झालेले नाही.

बालगंधर्व नाट्यगृहाची दुरवस्था

नटसम्राट बालगंधर्व यांनी ज्या ठिकाणी पहिले नाटक सादर केले त्या मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह सुरू होऊन 17 वर्षे पूर्ण झाली. या नाट्यगृहापासून मिळालेले उत्पन्न हे खर्चापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. दिवसेंदिवस उत्पन्न घटत आहेच. आजही येथे सुविधांचा अभाव कायम आहे. ए.सी. भंगार झाले आहे. पत्रे खराब झाल्याने नाट्यगृह गळके झाले आहे.

रस्त्याच्या कामासाठी भाजी मंडई रखडली

मिरजकरांच्या अनेक प्रश्नांपैकी भाजी मंडई हा एक प्रश्न. मिरजेच्या मार्केट व किल्ला भागात असणार्‍या खंदाकातील सुमारे दोन एकर जागेवर 1979 मध्ये भाजी मार्केटचे आरक्षण पडले. तेव्हापासून या जागेवर भाजी मंडई बांधण्याची मागणी आहे. 1989 पासून या मागणीला जोर धरला. त्यानंतर या मागणीसाठी शहरामध्ये अनेक आंदोलने झाली. शहरातील विकास योजनेअंतर्गत खंदकातील या जागांवर आरक्षण क्रमांक 9 अंतर्गत आठवडा बाजाराचे आरक्षण ठेवण्यात आले होते. भाजी मंडईसाठी 13 कोटी रुपये मंजूर झाले. तो निधी (funding) महापालिकेकडे आला. ठेकेदाराकडून खंदकाच्या जागेवर तीन मजली इमारत बांधण्याचे कामही सुरू आहे. मात्र रस्त्यासाठी या कामावर परिणाम झाल्याने काम अपूर्ण आहे.

मटण, मच्छी मार्केट नव्हे, दुर्गंधी मार्केट

मटण मार्केट संस्थानकालीन आहे. सुमारे शंभरहून अधिक वर्षे या मार्केटला पूर्ण झाली आहेत. याच मार्केटमध्ये मच्छी मार्केटही आहे. या दोन्ही मार्केटमध्ये स्वच्छता नसल्याने नेहमी दुर्गंधी असते. महापालिकेकडून येथील व्यावसायिकांकडून भाडे, मालमत्ता करही भरून घेतला जात नाही. महापालिका व या व्यावसायिकांच्या वादामुळे या मार्केटची दुरुस्ती केलेली नाही. मार्केटच्या नुतनीकरणासाठी ठेवलेले 67 लाख रुपये पडून आहेत. त्याचे काम सुरू झालेले नाही. ते त्वरित सुरू झाले नाही तर निधी परत जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *