कोल्हापूर पॅटर्न फेटाळला; तिसरी बैठक पुन्हा निष्फळ
जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस दराचा कोल्हापूरचा पॅटर्न शनिवारी धुडकावला. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेनेे साडेबारा टक्केपेक्षा जादा उतारा असणार्या कारखान्यांनी पहिली उचल 3 हजार 250 आणि साडेबारापेक्षा कमी उतारा असलेल्यांनी 3 हजार 200 रुपये देण्याची मागणी केली. मात्र, कारखानदार अनुक्रमे 3 हजार 150 आणि 3 हजार 100 रुपयांवर ठाम राहिले. स्वाभिमानी संघटनेने दिलेला नवा प्रस्तावही कारखानदारांनी अमान्य केला. त्यामुळे ऊस दरासाठी झालेली तिसरी बैठक (meeting) ही निष्फळ ठरली.
ऊस दराबाबत तोडग्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक आयोजिली होती. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, विश्वास कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, ‘क्रांती’चे शरद लाड, ‘वसंतदादा’चे अध्यक्ष विशाल पाटील, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, महेश खराडे, संदीप राजोबा आदींसह कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.
सुरुवातीला शेट्टी यांनी, गेल्यावर्षी तीन हजारपेक्षा कमी पैसे दिलेल्या कारखान्यांनी 100 रुपये आणि तीन हजार दिलेल्यांनी 50 रुपये तसेच यावर्षी एफ आरपी अधिक 100 रुपये द्यावेत, अशी मागणी केली. त्यानंतर गेल्यावर्षीच्या जादा रकमेबाबतची मागणी कारखानदारांनी मान्य केली. मात्र यंदाच्या हंगामातील दराबाबतच्या मागणीला असहमती दर्शवली. मात्र शेट्टी त्यांच्या मागणीवर ठाम राहिले.
त्यानंतर गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्केपेक्षा अधिक असलेल्या कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार 250 रुपये आणि साडेबारापेक्षा कमी उतारा असलेल्यांनी तीन हजार 200 आणि दहा टक्केपेक्षा कमी उतारा असलेल्या कारखान्यांनी तीन हजार 100 रुपये पहिली उचल द्यावी, असा अंतिम प्रस्ताव स्वाभिमानीने दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि कारखानदार यांच्यात पुन्हा बैठक झाली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्यांना बोलावले. त्यावेळी साडेबारापेक्षा जास्त उतारा असलेल्या कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार 150 आणि साडेबारापेक्षा कमी उतारा असलेल्या कारखान्यांनी तीन हजार 100 रुपये देण्याची सहमती दर्शवली. मात्र स्वाभिमानी त्यांच्या मागणीवर ठाम राहिली. त्यानंतर शेट्टी बैठकीतून निघून गेले. त्यामुळे तिसरीही बैठक (meeting) निष्फळ ठरली.
बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने कारखानदारांनी जिल्हाधिकार्यांकडे 26 पर्यंत मुदत मागितली आहे. त्यानुसार त्यांना मुदत दिल्याची माहिती देण्यात आली. मात्र 26 पर्यंत तोडगा निघाला नाही, तर प्रत्येक कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.
‘स्वाभिमानी’ची ही मागणी कारखानदारांना मान्य
जिल्ह्यातील ज्या कारखानदारांनी गतवर्षी तुटलेल्या उसाला तीन हजार रुपयांपेक्षा जादा दर दिला आहे, त्यांनी 50 रुपये व ज्या कारखान्यांनी 3000 च्या आत दर दिला आहे, त्यांनी शंभर रुपये देण्याचा प्रस्ताव दिला. तो कारखान्यांनी मान्य केला.