कोल्हापूर : फुटबॉल संघ, खेळाडूंवर कारवाई

(sports news) फुटबॉल मैदानावर वारंवार होणारी हुल्लडबाजी रोखण्यासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने कारवाईचा बडगा उचलला आहे. 15 डिसेंबरपासून सुरू झालेल्या 2023-24 च्या हंगामातील केएसए लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांवेळी झालेल्या गैरप्रकारांसाठी कारणीभूत ठरलेल्या संघ व खेळाडूंवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे एकूणच केएसए अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे.

केएसए लीग स्पर्धेत कोल्हापूर पोलिस संघ वारंवार अनुपस्थित राहात असल्याने त्यांना लीगमधून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापूर पोलिस संघाचे यापुढील सामने रद्द करण्यात आले आहेत. पोलिस संघाला आता 2024-25 च्या हंगामात केएसए ब गटातून खेळावे लागणार आहे.

पाटाकडील-शिवाजी मंडळ संघांना कडक समज

केएसए लीग स्पर्धेत 23 डिसेंबर रोजी झालेल्या सामन्या दरम्यान आणि सामना संपल्यावर मैदान, प्रेक्षक गॅलरी आणि स्टेडियमबाहेर झालेल्या सर्वच गैरप्रकारांची केएसएने दखल घेतली असून सामना खेळणार्‍या पाटाकडील व शिवाजी मंडळ यांना कडक समज देण्यात आली आहे. भविष्यात असे गैरवर्तन पुन्हा झाल्यास संघांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

23 डिसेंबरच्या सामन्यात गैरवर्तन केलेल्या पाटाकडील तालीम मंडळ अ संघातील 7 खेळाडूंना पंचांनी यलो कार्ड दाखविले. एकाच सामन्यात सहापेक्षा अधिक कार्डची कारवाई झाल्याने बेशिस्त वर्तणुकीबद्दल पाटाकडील तालीम मंडळास 5 हजारांचा दंड करण्यात आला आहे. या दंडाची वसुली संघाच्या तिकीट विक्रीतील हिश्श्यातून करण्यात येणार आहे. पीटीएमच्या अक्षय पायमल, यश देवणे, ओंकार मोरे, अक्षय मेथे-पाटील, रोहित देसाई, सैफ हकीम, रोहित पोवार यांच्यावर यलो कार्डची कारवाई झाली होती. (sports news)

चार खेळाडूंना पुढील एका सामन्यासाठी बंदी

शिवाजी मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम अ यांच्यातील सामन्यात गैरवर्तन करणार्‍या शिवाजी मंडळच्या करण चव्हाण-बंदरे याच्यावर रेडकार्डची कारवाई झाल्याने त्यांच्यावर पुढील एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तसेच सामना संपल्यावर पीटीएमच्या सैफ हकीम, यश देवणे, रोहित पोवार यांनी प्रेक्षकांशी गैरवर्तन केल्याबद्दल त्यांच्यावरही पुढील एक सामना खेळण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय ओंकार मोरे व वृषभ ढेरे यांनीही मैदानात गैरवर्तन केल्याबद्दल कडक समज देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *