महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला! कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा?

(political news) आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून सर्वच तयारीला लागले आहेत. आगामी निवडमुकांसाठी दौरे, सभा, जागावाटपाबाबतची चर्चा, बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती देखील आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरवला असल्याची माहिती समोर आली आहे.

‘‘महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला तयार असून, त्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. ‘मेरिट’च्या आधारे जागावाटपाचे सूत्र निश्चित केले केले असून, लवकरच ते जाहीर केले जाईल. उलट महायुतीमध्ये वाद आहेत. महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादाने राज्यातील लोकसभेच्या ४० ते ४१ जागा जिंकेल’’, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केला.

पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कारभारावर यावेळी पटोले यांनी जोरदार टीका केली. ‘‘महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येतील. भाजपच्या विरोधात लढणाऱ्यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस सकारात्मक असून, या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शरद पवार, उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दिल्लीत चर्चा होईल’’, असेही त्यांनी सांगितले.

‘पुण्याची जागा निश्‍चित जिंकू’

कसबा विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस जिंकणार असा निर्धार पुण्यातील काँग्रेस भवनातच व्यक्त केला होता. त्याप्रमाणे पुणे लोकसभेची निवडणूकही काँग्रेसच जिंकणार असून, त्यासाठी उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर केले जाईल. इफेक्टिव्ह मेरिट’ हाच उमेदवारीचा निकष राहील, असे नाना पटोले यांनी सांगितले.

जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?

महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा फॉर्म्युला दिल्लीत ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. (political news)

याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडी २ जागा, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळणार, असल्याची माहिती आहे. दरम्यान, जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाटाघाटीची सुरुवात २२ ते २३ जागांपासून होऊ शकते. मात्र, चर्चेअंती दोन्ही पक्ष किमान तीन जागांवर पाणी सोडण्यासही तयार असल्याची माहिती आहे. याबातचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *