सांगली : ग्रीन फिल्ड हायवे योगेवाडी एमआयडीसीला जोडणार

प्रस्तावित पुणे – बेंगलुरू ग्रीन फिल्ड हायवे (highway) योगेवाडी एमआयडीसीला जोडण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. याबाबत मागणी करणारे आमदार सुमनताई पाटील यांचे पत्र घेऊन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. नितीन गडकरी यांनी मागणीस हिरवा कंदील दाखवला आहे.

आमदार सुमन पाटील यांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीत म्हटले आहे, केंद्र शासनाकडून नुकत्याच सर्व्हे झालेल्या पुणे – बेंगलूरू ग्रीन फिल्ड महामार्गासाठी जमिनी संपादन करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या महामार्गालगतच तासगाव तालुक्यातील योगेवाडी एमआयडीसीच्या आराखड्यास मंजूरी मिळाली आहे. सदरची एमआयडीसी उभी करण्याचे काम हे लवकरच सुरू होणार आहे.

आपल्या विभागाकडील पुणे-बेंगलुरू या ग्रीन फिल्ड महामार्गापासून (highway) प्रस्तावित एमआयडीसी दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग १६६ ई एमआयडीसीला जोडल्यास भविष्यात या एम.आय.डी.सी चा मोठा विस्तार होऊ शकतो. यामुळे दोन्ही तालुक्यामध्ये औद्योगिक तसेच कृषी क्रांतीस चालना मिळेल. तरी ही मागणी मान्य व्हावी. संबंधित अधिका-यांना याबाबतचे आदेश देण्यात यावेत.

यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी या एमआयडीसी उभारणीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल आमदार सुमनताईसह रोहित आर. आर. पाटील यांचे कौतूक केले. तसेच या मागणीस हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबतचे निर्देश देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *