इराणी मल्लांवर ‘महाराष्ट्र केसरी’ भारी

(sports news) तांबड्या मातीत शड्डू ठोकत एकमेकांना आव्हान देणारे मल्ल…, रणहलगीचा ठेका… तुतारीचा निनाद… आणि शेकडो कुस्तीप्रेमींच्या टाळ्या-शिट्ट्यांनी राजर्षी छत्रपती शाहू खासबागेत स्वराज्य केसरी कुस्ती मैदान रविवारी झाले. या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात अंत्यत चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर (पुणे) याने इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल महदी इराणी नाकपटी डावावर, तर दुसर्‍या लढतीत महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील ( कोल्हापूर ) याने आंतरराष्ट्रीय विजेता मल्ल हादी इराणी (इराण) याला घुटना डावावर चितपट केले. तिसर्‍या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ (पुणे) याने पंजाबचा आंतरराष्ट्रीय पैलवान लवप्रित खन्नावर गुणांनी मात केली.

महिला कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय पदक विजेती पै. रेश्मा माने (वडणगे) हिने हरियाणाची आंतरराष्ट्रीय पदक विजेती पै. पिंकी हिला ढाक डावावर, इचलकरंजीच्या पै. पूजा सासने हिने झोळी डावावर कुरूंदवाडच्या पै. तनुजा सदाकालेवर मात केली. मंडलिक आखाडा मुरगूडची महाराष्ट्र केसरी पै. अमृता पुजारी व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती तन्नू रोहतक (हरियाणा) यांच्यातील लढत बरोबरीत सोडविण्यात आली. पै. गौरी पाटीलने प्रमिला पोवारवर तर पै. वेदिका सासने हिने शिवानी मेटकर, पै. तन्वी मगदूम ने पै. कीर्ती गुंडलेकर हिच्यावर गुणांवर विजय संपादन केला.

विजेत्या मल्लांना स्वराज्य केसरी 2024 व चांदीची गदा देऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ, शाहू महाराज, मंत्री दीपक केसरकर, संभाजीराजे, मालोजीराजे, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, पी. एन. पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, शहाजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, हिंदकेसरी महाबली सतपाल, डॉ. जयसिंगराव पवार, तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. मैदानात 150 चटकदार कुस्त्या झाल्या. महाबली हिंदकेसरी पै. सतपाल प्रमुख उपस्थित होते.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी आमदार के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, पै. विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, नामदेव मोळे, गुलाब बरळे, राम सारंग, फत्तेसिह सावंत, संजय पवार, विनायक फाळके, हेमंत साळोखे, डॉ. वसुधा पवार, अरुंधती महाडिक, वेदांतिका माने, ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड, बाजार समितीचे सभापती भारत पाटील उपस्थित होते.

दरम्यान 20 ते 30 किलो, 31 ते 40 किलो, 41 ते 50 किलो, 51 ते 60 किलो, 61 ते 70 किलो, 71 ते 89 किलो अशा गटांत 134 चटकदार लढती झाल्या. डाव-प्रतिडावांनी मैदानात चैतन्य बहरले होते. प्रमुख कुस्त्यांसह सर्व लढती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आल्या.

मैदान कुस्तीप्रेमींनी तुडुंब

महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून कुस्तीप्रेमी कुस्ती पाहण्यासाठी खासबाग मैदानात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजता मैदान खचाखच भरले. मैदानाबाहेर भव्य स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे मैदानाबाहेर राहिलेल्या कुस्तीशौकिनांना आनंद घेता आला. मैदानामध्ये अत्याधुनिक फोकस लाईट सोडण्यात आल्यामुळे खासबाग मैदान विद्युतझोतात झगमगले होते. सर्वत्र भगव्या पताका व ध्वज लावल्यामुळे मैदान खुलून दिसत होते. (sports news)

ज्येष्ठ मल्लांचा सत्कार

हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, वस्तादांसह कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या 350 कुस्तीप्रेमींचा भगवे फेटे, गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निवेदक बटू जाधव, राजाराम चौगले, कृष्णात चौगुले, पंडित कंदले यांनी त्यांच्या कुस्तीच्या कामगिरीला उजाळा दिला.

माजी उपमहापौर यांच्याकडून मल्लांना बक्षीस

जिथे कुस्ती तिथे माजी उपमहापौर भूपाल शेटे मल्लांना भरघोस बक्षीस देतात. याही मैदानात त्यांनी विजेत्या मल्लांना खुराकासाठी देणगी व बक्षीस दिले.

संभाजीराजे, सतपाल यांची दमदार एंट्री

तुडुंब भरलेल्या खासबाग मैदानाच्या पश्चिम प्रवेशद्वारातून संभाजीराजे, कुस्तीशौकिनांच्या गळ्यातील ताईत असणारे पै. हिंदकेसरी सतपाल यांची सायंकाळी 7 वाजता हलगीचा दणदणाट, तुतारी निनादात, जय भवानी, जय शिवाजी असा अखंड जयघोष करत प्रेक्षकांतून दमदार एंट्री झाली.

मैदानातील प्रमुख विजयी कुस्तीगीर

पै. कौतुक डाफळे, पै. अरूण बोंगर्डे, पै. श्रीमंत भोसले, पै. रोहण रंडे, पै. सुरज मुंडे यांनी प्रतिस्पर्धी मल्लांवर मात केली तर पै. मुन्न झुंजूरके व पै. कार्तिंक काटे, पै. अतुल डावरे व पै. अभिजित झेंडे यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

मल्लांना 10 लाखांचा आरोग्य विमा

स्वराज्य केसरी 2024 कुस्ती स्पर्धेत सहभागी मल्लांच्या आरोग्यासाठी 10 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच देण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी घेतला आहे. या कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मल्लांचे विमा फॉर्म भरून घेण्यात आले. त्यामुळे मल्लांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *