इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांचे फेसबुक अकाऊंट हॅक

इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे फेसबुक अकाऊंट सोमवारी अज्ञाताने हॅक (hack) केले. संबंधित अकाऊंटवरून अनेकांकडे पैशाची मागणी झाली, तर अकाऊंटवर असणार्‍या मित्र परिवार व नातेवाईकांचे फोन क्रमांक संबंधित व्यक्तीने संकलित करून गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

‘कुमार गणेशा’ या नावाने फेसबुक अकाऊंट सुरू आहे; परंतु त्यावर असणारे सर्व फोटो आयुक्त दिवटे यांचे आहेत. दुपारपासून आयुक्तांना अनेकांचे फोन आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आयुक्तांनी तातडीने ‘सायबर क्राईम’शी संपर्क साधून तक्रार दिली. आयुक्तांना त्यांच्या मित्र परिवाराने कळवल्यानंतर त्यांना आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समजले. फेसबुकवर जवळपास तीन ते चार अकाउंट आयुक्त दिवटे यांची आहेत. त्यातील एक अकाउंट हॅकरने हॅक (hack) केले आहे. त्याचे नाव बदलून कुमार गणेशा असे ठेवण्यात आले आहे. या अकाउंट वरून फेसबुक फ—ेंड लिस्टमधील अनेकांना टीव्ही,  वॉशिंग मशीन कमीत कमी दरात देऊ असे मेसेज गेले. त्याच्यावर प्रतिसाद येत नसल्याचे समजल्यानंतर त्याने अकाउंट वरील सर्वांचे फोन क्रमांक मिळवले.

संबंधित व्यक्ती हा आर्मीमध्ये असल्याचे सांगून आयुक्तांच्या फेसबुक फ—ेंडमधील अनेकांना व्हाट्सअप द्वारे मेसेज करीत आहे. हॅकरने व्हाट्सअ‍ॅपच्या डीपीवर आर्मीचे कपडे घातलेला फोटो लावलेला आहे. तसेच संतोष कुमार सीआरपीएफ हे नाव सुद्धा व्हाट्सअपवर ठेवलेले आहे. या अकाउंट वरून अनेकांना मेसेज जात आहेत व विविध घरगुती उपकरणांची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्तीच्या व मोबाईल क्रमांकाच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे आयुक्त दिवटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *