मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी
काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या (reservation) मुद्द्यावरून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भातील काही आश्वासनं देत सरकारच्या वतीनं अध्यादेश काढण्यात आला. पण, त्यानंतरही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीच्या आणि तत्सम इतर अटींची पूर्तता न झाल्यामुळं पुन्हा उपोषण सुरु केलं. या उपोषणादरम्यान, जरांगे यांची प्रकृती आता खालावू लागल्यामुळं सरकारची धावपळ सुरु झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळं आता सरकारनं मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा उपसमिती बैठकीत विशेष अधिवशेनाबाबतचा निर्णय झाला होता. ज्यानंतर आता आरक्षणाचा कायदा नेमका कधी पारित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा गुरुवारी (15 फेब्रुवारी 2024) सहावा दिवस आहे. बुधवारी जरांगे यांना नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मध्यस्थीनं बळजबरीनं सलाईन लावण्यात आलं होतं. पण, त्यांनी काही वेळातच उपचार घेणं बंद केलं. जोपर्यंत आरक्षणाचा (reservation) प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असा ईशारा जरांगेंनी दिला. बुधवारी अखेर जरांगेंच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांकडे त्यांना पाणी पाजण्याचा हट्ट धरल्यानंतर पत्रकारांनी जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देत जरांगे यांनी पाणी घेतलं.
उपोषणावर असताना प्रकृती खालावल्यामुळं जरांगेंवर प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले होते. पण, त्यांनी सलाईनही काढून फेकलं. उपचार करुन घ्यायला नकार देत, सलाईन लावायचं असेल तर सरकारला धारेवर धरा, असं ते म्हणाले. ‘आपण मेलो तर आपल्याला सरकारच्या दारात टाका’, अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा तुमचा सुपडा साफ करून टाकू, असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिला. इथं उपोषणावर बसलेल्या जरांगेंची प्रकृती दिवसागणिक खालावत असतानाच तिथं आता सरकारनंही त्यांच्या परिनं तयारी सुरु केली असून, विषेश अधिवेशनात नेमकं काय घडतं याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.